शितकडा धबधब्यावर रॅपलिंगचा थरार! सातारा येथील गिर्यारोहक रोहित जाधवकडून मोहिमेतून 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा!
सातारा | अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कुमठे गावचे गिर्यारोहक रोहित जाधव यांनी नाशिक जिल्ह्यातील शितकडा धबधब्यावरील तब्बल 350 फुटांच्या रॅपलिंगचा थरार सुरक्षितपणे अनुभवला. त्यानंतर तिरंगा फडकावित 75 वा भारतीय स्वातंत्र्यदिन दिमाखात साजरा केला. ही धाडसी मोहीम सांगली-कोल्हापूर-चिपळूण या पूरग्रस्त भागातील नागरिकांचे प्राण वाचविणारे NDRF चे जवान आणि टोकियो ऑलम्पिकमध्ये ज्या खेळाडूंनी आपल्या भारत देशाला मेडल मिळवून दिली अशा सर्व खेळाडूंना समर्पित केली.
या मोहिमेची सुरवात उंभ्रांडे गाव (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथून झाली. अर्ध्या तासाची पायपीट करून नदीपात्र ओलांडला की शितकडा धबधबा येतो. पहिला 10 फुटी खडकाळ टप्पा संपल्यानंतर धबधब्याचे मनात धडकी भरवणारे रौद्ररूप दिसते. रॅपलिंगच्या उतार झाल्यावर कड्यावर चित्तथरारक अनुभूतीसाठी या ठिकाणी चेहरा खडकाच्या दिशेने आणि पाठ दरीच्या दिशेने करून शरीरावर दोरीच्या साहाय्याने नियंत्रण ठेवून दरीच्या दिशेने झुकावे लागते.
पहिला 100 फुटांचा टप्पा पार करताना हातातील दोरी वरती ओढून शरीर खाली घ्यावे लागते. शेवटचा 80 फुटांचा टप्पा हा धबधब्याच्या पाण्यातून गेल्याने रॅपलिंगचा हा अनुभव चित्तथरारक ठरतो. अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात सातार्याचे गिर्यारोहक रोहित जाधव, जळगावमधील पुणे येथे DRDO RDE ( Engg) येथे कार्यरत असलेले प्रदीप बारी आणि नाशिक येथील दर्शन कापडणीस या गिर्यारोहकांनी टीम पॉइंट ब्रेक अॅडव्हेंचर्सच्या (नाशिक) चेतन शिंदे, जॉकी साळुंखे, चेतन बेंडकोळी, अमोल तेलंग, सौरव भगत, अर्चना गडदे या गिर्यारोहकांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे मोहीम फत्ते केली.
आव्हानांचा सामना करत मोहीम फत्ते!
तब्बल 350 फुटांचे चित्तथरारक रॅपलिंग, धुक्यात हरवलेला परिसर, मुसळधार पाऊस, ओले कातळकडे, निसरडी पाऊलवाट, शेवाळलेले खडक, हुडहुडी भरवणारी थंडी, कधी दोरीच्या साह्याने तर कधी काठीच्या साह्याने एकमेकांना आधार देत सुरक्षितपणे नदीपात्र ओलांडणे, अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.