इंदापूर तालुक्याची शान व शरद पवार यांचे जवळचे मित्र ज. मा. मोरे काळाच्या पडद्याआड!

Spread the love

इंदापूर | माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मित्र तसेच इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील जगन्नाथराव मारुतीराव मोरे उर्फ ज. मा. मोरे यांचे बुधवारी (दि.६) सकाळी 6 वाजता सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले. त्यांचे वय ८८ होते. ‘जमा आप्पा’ म्हणून ते सर्वदूर परिचित होते. त्यांच्या मागे मुलगा भारत, नातू समीर, नातू रवी , सुना, नातवंडे, तीन भाऊ असा परिवार आहे.

शरद पवार व जमा मोरे यांचे फार घनिष्ट मित्रत्व होते. पवारांचे ४६ वर्षाचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ते ओळखले जात. ज.मा. मोरे यांनी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसेच इंदापूर तालुका पंचायत समितीच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच दहा वर्ष सभापतीपदी (१ मे १९६२ ते ५ ऑगस्ट १९७२) कार्यरत होते. इंदापूर तालुक्यातील सर्वच राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

पवार-सुळेंच्या दौऱ्यात हमखास सहभाग

शरद पवार किंवा त्यांच्या कन्या- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर दौरा असला, की त्यांच्या दौऱ्यात जमा मोरे हे नेहमी असायचे. विशेष म्हणजे शरद पवार आपल्या गाडीमध्ये त्यांना बसवत असत आणि इंदापूर तालुक्याचा दौरा करत असत.

पवारांची हत्तीवरुन मिरवणूक

जेव्हा जेव्हा शरद पवार हे निमगाव केतकीवरुन पुढे कुठेही जात असत तेव्हा ते ‘जमा आप्पा’ यांना भेटल्याशिवाय जात नव्हते. जमा आप्पा यांनी निमगाव केतकी मध्ये शरद पवार व गोविंदराव आदिक यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. आजही निवडणुकीच्या रणधुमाळीत या प्रसंगाची चर्चा होते.

विनोदी शैलीतील भाषणं गाजली

विनोदी शैलीची आप्पांची भाषणे ऐकायला मोठी गर्दी होत असे. पवार यांच्याबरोबरचे अनुभव प्रसंग व संपूर्ण कारकिर्दीचा लेखाजोखा त्यांनी ‘गुंफियले मोती मैत्रीचे’ या पुस्तकातून प्रकाशितदेखील केला आहे.

जमा मोरे यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तसेच इंदापूर तालुका पंचायत समितीच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच दहा वर्ष सभापतीपदी (1 मे 1962 ते 5 ऑगस्ट 1972) कार्यरत होते.

आयुष्यातील एक पितृतुल्य आदर्श मार्गदर्शकाला मुकलो – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

देशाचे नेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे जवळचे स्नेही मित्र व माझे मार्गदर्शक आदरणीय जगन्नाथ (आप्पा) मोरे यांच्या निधनाची बातमी मनाला फार चटका लावणारी असून, आज माझ्या आयुष्यातील एक पितृतुल्य आदर्श मार्गदर्शकाला मुकलो.
आदरणीय मोरे आप्पांच्या निधनामुळे मोरे परिवारावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर मोरे कुटुंबास या दु:खातून सावरण्याची शक्ति देओ, ही ईश्वर चरणी प्रार्थना, अशी आदरांजली भरणे यांनी त्यांच्या फेसबुक वर शेअर केली आहे. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही ज.मा. मोरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.