नक्की हा पवार कुटुंबातील वाद की पुन्हा पहाटेच्या राजकारणासारखा खेळ?

Spread the love

बारामती | पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत आणि आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही’ असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या नातवाबद्दल पहिल्यांदाच जाहीर बोलले आहेत. पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाच्या भूमिकेशी विसंगत अशी भूमिका घेणे सुरू केले आहे. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभाचे त्यांनी स्वागत केले होते. कोट्यवधी हिंदूंसाठी हा ऐतिहसासिक दिवस असल्याचे ते म्हणाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पार्थ हे शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. देशावर कोरोनाचे संकट असताना राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे, कदाचित राम मंदिरामुळे कोरोना पळून जाईल असे त्यांना वाटत असावे’ या शब्दात शरद पवार यांनी भूमिपूजनाच्या टायमिंगला विरोध केला होता. त्याच वेळी पार्थ यांनी भूमिपूजनाचे स्वागत केले.

एकीकडे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांची पाठराखण महाविकास आघाडी सरकारने चालविलेली असताना पार्थ पवार यांनी मात्र या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. तशा मागणीचे पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआय चौकशीबाबत काय तो निर्णय घेतला जाईल, असे सांगत देशमुख यांनी सीबीआय चौकशीचा चेंडू तूर्त तरी टोलवला आहे. पार्थ यांच्या या मागणीवर शरद पवार काय बोलतील याबाबत उत्सुकता होती. अखेर बुधवारी साहेबांनी मौन सोडले. ‘पार्थ अपरिपक्व आहे, त्याच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही’ असे सांगत त्यांनी पार्थ यांना चांगलेच फटकारले. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दुवा म्हणून काम पाहणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात बुधवारी पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले. याचा अर्थच पवार-राऊत चर्चेत पार्थच्या मागणीची चर्चा झाली आणि त्यावर बाहेर जाऊन पवारांनी पत्रकारांशी बोलावे असे ठरले असण्याची दाट शक्यता आहे.

आजोबांच्या या प्रतिक्रियेवर पार्थ काहीही बोललेले नाहीत. मला त्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांचीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि ती येण्याची शक्यता नाही. असल्या वादाच्या मुद्यांवर अजितदादांनी गेली काही महिने मौनच बाळगले आहे. कोणत्याही राजकीय मुद्यावर ते कोणतेही मत हल्ली व्यक्त करत नाहीत. कदाचित अशा विषयांवर काकाच काय ते बोलतील असे सूत्र त्यांनी स्वत:पुरते ठरविलेले दिसते. पार्थ यांनी मात्र राम मंदिरापासून सुशांतपर्यंत विविध विषयांवर मते व्यक्त करण्यास आणि प्रसंगी पक्षविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या भूमिकेस अजित पवार यांचे आशीर्वाद, पाठिंबा वा बळ आहे का, याबाबत काहीही कळू शकलेले नाही. पार्थ नव्या पिढीचे आहेत आणि ही अशी पिढी आहे की, जी वडीलधाऱ्यांच्या मताला छेद देण्यास मागेपुढे पाहात नाही. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची सल मनात असलेले पार्थ दरम्यानच्या काळात काहीसे बंडखोर स्वभावाचे झाले असण्याची शक्यता आहे.

शेवटी ते अजित पवार या स्वाभिमानी वडिलांचे पुत्र आहेत. त्यामुळे चौकटीत राहणे तसेही त्यांच्यासाठी कठीणच. सध्याच्या घडीला इतकेच महत्त्वाचे आहे की, पवारांच्या घराण्यातील एका तरुणाने मांडलेल्या भूमिकेवर स्वत: शरद पवार यांना बोलावे लागत आहे. असे यापूर्वी घडले नव्हते. पवारसाहेबांनी तिसऱ्या पिढीतील वारसदार म्हणून पार्थ यांच्याऐवजी रोहित पवार यांना पसंती दिली. रोहित आमदार झाले. पार्थ लोकसभेत पोहचू शकले नाहीत. पार्थ यापुढेही विविध मुद्यांवर बोलायचे थांबतील असे वाटत नाही. त्यांनी दरवेळी पक्षाशी विसंगत भूमिका घेतली तर राष्ट्रवादीची आणि पवारसाहेबांची डोकेदुखी नक्कीच वाढेल. पार्थ यांच्या एक-दोन विधानांनी लगेच पवार कुटुंबात कलह सुरू झालाय असे मानण्याचे कारण नाही; पण अस्वस्थता कुठे तरी दिसत आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.