Lockdown Update: राज्यात 4 टप्प्यात अनलॉकिंग; काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?
मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता सरकार लॉकडाऊन कधी उठवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, यापूर्वीचा अनुभव पाहता ठाकरे सरकार लॉकडाऊन उठवताना कोणतीही घाई होणार नाही, याची विशेष काळजी घेणार आहे. त्यासाठी राज्यातील लॉकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार..
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.