मुलखावेगळी माणसं..कोरोनाच्या काळातली कहाणी काका काकीची!
#कहाणी माने काका व माने काकीची
लेखक: श्रीकांत रामचंद्र करे
इंदापूर | सध्या लॉकडाऊन मध्ये अनेक लोक अडचणीत आहेत, अनेक प्रस्थापितांच्या नोकऱ्या जाऊन ते विस्थापित झालेले आहेत, स्वतःच्या कोषात जगणाऱ्यांना निसर्गाने झटक्यात जागेवर आणले आहे, असंख्य लोकांना या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, अनेक खचून गेले , तर काही परिस्थितीशी भिडले, सेलिब्रिटी अभिनेते या परिस्थितीपुढे हात टेकून आत्महत्या करतात , तर अशा बिकट परिस्थितीत सामान्य माणसं परिस्थितीशी दोन हात करण्यास उभे राहतात, यालाच म्हणतात कॉमन मॅनची पॉवर.
असेच हे जेष्ठ नागरीक मानेकाका व माने काकी ,गाव शेळगाव, तालुका इंदापूर ,जिल्हा पुणे , यांनी लॉक डाउन काळात बाजार बंद ,गुऱ्हाळ बंद मग कल्पकतेने स्वतःचा व्यवसाय शोधला आहे,
इतकंच नाही तर स्वतः अतिशय कमी रकमेतून अगदी भंगार सामानातून चार चाकी गाडी बनवून घेतली, त्याला किर्लोस्कर इंजिन जोडलं, जीपचा जुना गिअरबॉक्स बसवला , एक छोटा स्पीकर बसवला व या हँड मेड गाडीच दुकान बनवून,
आजूबाजूच्या खेडोपाडी कच्या रस्त्याने,पांदण वाटेने, स्पीकर मधून ग्राहकांना बोलावले जाते व या गाडीतून टोपल्या ,झाप, केरसुणी, तसेच कांदा ,बटाटे तरकारी, अशी जीवनावश्यक वस्तू घेऊन फिरतात, त्यांनी ही गाडी अतिशय कल्पकतेने बनवली असून साधारण अडीच टनापर्यंत ही गाडी वजन पेलू शकते, कमी डिझेलमध्ये ही गाडी चालते,मेंटेनन्स जास्त येत नाही, या गाडीचा उपयोग ते पंढरपूर वारी साठी देखील करतात ते देहू ते पंढरपूर पालखी काळात याच गाडीत ते दुकान चालवतात, याचबरोबर चहाची देखील सेवा लोकांना देतात, त्यांना जास्त मोबदल्याची अपेक्षा नाही, अशी माणसं जीवनात आलेल्या संकटांशी दोन हात करायला तयार होतात.
कुठलाही संकटाचा सामना करण्याची जिद्द हवी,मग मार्ग निघतोच,
ही सामान्य माणस असामान्य कर्तृत्व गाजवत असतात, कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी, न करता दुखाच अवडंबर न माजवता,
आनंदाने जगत असतात आणि आपल्या आनंदाने जगण्यास शिकवत असतात, आपणही या ज्येष्ठ दाम्पत्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि संकटातून मार्ग काढायला हवा, संकटांशी रडून नाही तर लढून जिंकावे लागते ,हेच मानेकाका माने काकी दाखवत आहेत , ही महाराष्ट्राची माती सहजा सहजी हार मानत नाही, हेच या जेष्ठ दाम्पत्याने दाखवून दिले आहे, यांना मानाचा मुजरा.