महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, उद्या तेच असतील; भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा?
मुंबई | महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनलेलं पाहायचं आहे. शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे. येत्या काळात तिन्ही पक्ष कायमचे विरोधात बसतील, आपण आता विरोधकांचं काम करत राहू, असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले आहेत. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये उजव्याला डाव्याचं माहीत नाही. राजकारणात धोका होत असतो. येत्या काळात तिन्ही पक्ष नेहमीसाठी विरोधकांमध्ये जाऊन बसतील. येणाऱ्या काळात आम्हीच राज्यकर्ते असू, अशा विश्वासही जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे. आम्ही जगातील मोठा पक्ष झालो असून, आता आम्हाला अजेंडा सेट करावा लागणार आहे. शिक्षणाच्या धोरणावर चर्चा करत असताना नेहमीच वाद होतात. पण आम्ही मांडलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण सर्वांनी एकमतानं मंजूर केलं आहे.
स्वामिनाथन समितीच्या रिपोर्टला मोदी सरकारनं 2014पासून लागू करायला सुरुवात केली आहे. सॉइल कार्ड कोणी आणलं?, शरद पवारांनी म्हटल्यास तुमच्यासाठी ते खूप छान आणि मोदी म्हणतील तर वाईट, असा टोलाही जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेला लगावला आहे. फायदा झाल्यास शेतकऱ्यांना होणार आहे आणि नुकसान झालं तर व्यापारांना होईल. काँग्रेस फक्त बोलायची एपीएमसीतून शेतकऱ्यांना मुक्त करू, पण आम्ही ते करून दाखवलं. आता काँग्रेसचे नेते ट्रॅक्टरवर गादी लावून फिरत आहेत आणि ट्रॅक्टरचा अपमान करत आहेत. आम्ही शेतकरी आणि त्यांच्या नांगराचासुद्धा सन्मान करतो, असंही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले आहेत.
भाजपच्या राज्य प्रदेश पदाधिकारी आणि प्रदेश कार्यसमितीची आज बैठक झाली. दादरच्या वसंत स्मृती पक्ष कार्यालयात ही बैठक पार पडली आहे. बैठकीला प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, प्रवीण दरेकर, खासदार प्रीतम मुंडे, रक्षा खडसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. इतर नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिले होते. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीसुद्धा व्हिडीओ कॉफरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीला संबोधित केलं आहे. केंद्राने मंजूर केलेला कृषी कायदा, कामगार कायदा तसेच इतर विषयांवर या बैठकीतच चर्चा झाली आहे.