डोकेदुखी; अस्वस्थ करणारा आजार?
डोके दुखायला लागले की कामात मुळीच लक्ष लागत नाही. कुणाशी बोलण्याची इच्छा होत नाही. एखादवेळी डोके दुखत असेल तर फक्त झोप काढली तरी एकदम बरे वाटायला लागते. परंतु ही डोकेदुखी नित्याची होत असेल तर ? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघूया या डोकेदुखीला.
मलावरोध, मलमूत्रादी नैसर्गिक वेगांना अडविणे, दिवसा झोपणे, मद्यपान, थंडी, रात्री जागरण, तीव्र दुर्गंध येणाऱ्या वस्तूंचा वास घेणे, धूळ – धूर – उन्हात फिरणे, अत्यंत थंड पाणी पिणे वा थंड स्नान करणे, आघात, पचायला जड – आंबट – उग्र मसाले खाणे, अतिशय बोलणे, अति रडणे, अश्रुवेग अडकविणे, अशा विविध कारणांनी शिरःशूल होऊ शकते. दोषानुसार या शिरःशूलामध्ये लक्षणामध्ये बदल दिसून येतात. आयुर्वेदात वात, पित्त, कफ या त्रिदोषांच्या प्राधान्याने डोकेदुखीमध्ये लक्षणभिन्नता आढळून येते. त्यानुसार चिकित्सा पण बदलते.
थंडीने डोकं दुखत असेल तर ते जड होते. कफाने लिप्त असल्याप्रमाणे वाटते तसेच थंडी वाजते. डोळे, चेहरा सुजल्याप्रमाणे वाटणे. ही लक्षणे असतात.
पित्ताने डोकेदुखी होत असेल तर गरम स्पर्श असतो. नाक, डोळे, उष्ण वाफा निघत असल्याप्रमाणे वाटते. रात्री थंडाव्यामुळे शांत वाटते.
वातवृद्धीने डोकेदुखी होत असेल तर तीव्र डोकेदुखी असते. शिरा फडफडतात, नाकतोंड कोरडे पडणे. रात्री शिरःशूल वाढणे, डोकं बांधले तर आराम पडतो.
- याव्यतिरिक्त त्रिदोषज, रक्तज, क्षयज आणि कृमीमुळेदेखील शिरःशूल उद्भवतो. यानुसार चिकित्सा बदलते.
- मलावरोध अजीर्णात रेचक औषध उदा. एरंडतेल, त्रिफळा चूर्ण घेतल्यास शिरःशूलही बरा होतो.
- कृमीमुळे डोकेदुखी असेल तर आहारात कडू पदार्थ, कृमीहर औषधाने उपशय मिळतो.
- पित्तामुळे होणाऱ्या शिरःशूलात पित्तशामक औषधीसह मोरावळा, डाळिंबाचा रस उपयोगी ठरतो.
- डोकेदुखीसह मळमळणे, डोके जड वाटणे अशी लक्षणे असतील तर वांतीने बरे वाटते.
- नाक, कान, डोळे यांच्या विकृतीमध्येही डोकेदुखी असतेच. त्या अवयवाची चिकित्सा केल्याने शिरःशूल थांबतो.
- शिरःशूलाची चिकित्सा कारणानुसार, दोषानुसार बदलते. वैद्याचा सल्ला घेऊन त्वरित उपचार नक्कीच करावे. शिरोधारा, वमन विरेचन नस्यादि पंचकर्म, लेप, तेलाने शिरोभ्यंग, कर्णपूरण इ. चिकित्सा यावर उपयोगी ठरतात.