Spread the love

संपादकीय | कोविड संक्रमणाची तीव्र लाट पुन्हा सुरु झालीय. कोविड होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यकच आहे. मास्कचा वापर, स्वच्छता, गर्दीची जागा टाळणे या सर्व गोष्टी गरजेच्या आहेतच. तशा या सूचना आपल्याला आता अंगवळणी पडल्या आहेत. यासोबतच मुख्य आहे आहारविहाराकडे दुर्लक्ष न करणे. वसंत ऋतुचर्या पाळणे इथे खूप महत्त्वाचे आहे. वसंत ऋतुचर्येच्या आधीच्या लेखात वसंत ऋतुची लक्षणे त्यानुसार आहारात बदल याबद्दल आपण वाचले असेल तर लक्षात येईल की ते पाळल्यास बऱ्याच गोष्टी नियंत्रणात येऊ शकतात.

या काळात उष्णतेने, शरीरात साचलेला संचित कफ पातळ होऊन बाहेर पडू लागतो त्यामुळे या काळात कफाचे विकार होतांना दिसतात. आहारविहारात बदल जर केला नाही तर ते उग्र स्वरूपाचे दिसतात. उगीचच उष्ण काढे घेणे हे मात्र फार संयुक्तिक नाही. वातावरणातील उष्णता आणि त्यात उग्र काढा हा पित्ताचा त्रास वाढवू शकतो. त्यात जे सुकुमार नाजूक, पित्त प्रकृतिचे, पित्तविकार असणारे तसेच मूळव्याध, रक्तपतन असे त्रास ज्यांना आहे त्यांनी उष्ण औषधीचे काढे वैद्यांना विचारूनच घ्यावे.

रोगप्रतिकारशक्ती ही काही १ दिवसात वाढणारी गोष्ट नाही. योग्य दिनचर्या ऋतुचर्या आहार व्यायाम याचे नियोजन केल्यास प्रतिकारशक्ति नक्कीच चांगली असते. व्याधीक्षमत्त्वरूपी बल सहज कालज आणि युक्तिकृत असे सांगितले आहे. बल वाढविणारे पदार्थ, पौष्टिक आहार, व्यायाम, रसायन औषधांचे सेवन, ऋतुनुसार पंचकर्म या सर्व गोष्टी युक्तिकृत व्याधीक्षमत्त्व वाढविण्याकरीता चरकाचार्यांनी सांगितल्या आहेत. त्यामुळे ऋतु, वय, प्रकृति, देश, अग्नि (पाचन शक्ति) या सर्वांचा विचार करून आहार विहार असेल तर नक्कीच युक्तिकृतबल वाढण्यास मदत होते. स्वास्थ्य रक्षण होते.

आहार निद्रा ब्रम्हचर्य हे शरीराचे उपस्तंभ आहेत. या तीन गोष्टी विचलित झाल्या की शरीर व मनाचे स्वास्थ्य गणित बिघडणारच. आजाराला आमंत्रण मिळण्याची सुरवात होते. मग तो कोरोना असो वा इतर कोणताही आजार. त्यामुळे हलका आहार, पूर्ण झोप आवश्यक आहे. पचायला जड पदार्थ, कफ वाढेल असे थंड पेय लस्सी फ्रिजचे पदार्थ टाळा. तेलकट तुपकट पदार्थ दिवसा झोपणे टाळा.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.