आनंदाची बातमी; उजनी धरण लवकरच भरण्याची चिन्हे!

Spread the love

इंदापुर | तीन जिल्ह्याचे वरदायिनी असलेल्या उजनी धरणाकडे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. मागील एक-दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यात तसेच धरण साखळीत सुरु झालेल्या पावसामुळे उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. उजनी धरण 100 टक्के केव्हा भरेल याकडे या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. मागील वर्षीची तुलना करता धरणात यंदाच्या वर्षी कमी पाणीसाठा आहे.

मागील वर्षी सुरवातीच्या काळात पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे आजच्या दिवशी धरणात जवळपास दोन लाख 21 हजार क्युसेकने पाणी धरणात येऊन मिसळत होते. त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली होती. मागील वर्षी आजच्या दिवशी धरण 86 टक्यांमध्ये आले होते. पण, आजची स्थिती पाहिली तर धरण 14टक्यांच्या पुढे सरकले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात कमी पाणीसाठा असल्याचे स्पष्ट होते. सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला होता. याऊलट पुणे जिल्ह्यात या काळात पाऊस न झाल्याने पुणे जिल्ह्यातील धरणे अद्यापही भरलेली नाहीत. पण, दिलासादायक बाब म्हणजे मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातही पाऊस पडू लागला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणात येणार आहे. त्यानंतर धरण शंभर टक्के भरणार आहे. पण, त्यासाठी पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. दौंड येथून येणारे पाणी वाढत गेले तर धरणातील पाणीसाठा लवकर वाढण्यास मदत होणार आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.