राजगृहावर केलेल्या हल्ल्याच्या आरोपीस अखेर मुंबईत एकाला अटक!

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान असलेल्या राजगृह येथे नासधूस केल्याप्रकरणी एकाला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भा.दं.वि. कलम 447 आणि 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी उमेश जाधव वय 35 असे आरोपीचे नाव आहे.याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त विरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. आरोपी परळ परिसरात रस्त्यावर राहणारा असून याप्रकरणी आणखी एका संशयिता बाबत पोलिस तपास करत आहेत.
दादर येथील एक संशयित व्यक्ती मंगळवारी दि 7 सायंकाळी पाचच्या सुमारास राजगृहात शिरला आणि त्याने फुलझाडांच्या कुंड्यांची नासधूस केली होती. त्यानंतर त्याने दगडाच्या साह्याने इमारतीच्या काचा फोडल्या. यामध्ये आठ ते दहा कुंड्यांचे नुकसान झाले होते. त्याशिवाय आरोपीने तेथील सीसीटीव्हीही फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अटक केलेला हा आरोपी राजगृह येथील सीसी टीव्हीत दिसलेल्या संशयिताचा साथीदार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चालू असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.