BREAKING NEWS-पुण्यातील पवारांच्या ‘मोदी बागेत’ छापेमारी सुरू; आयकर विभागाची झाडाझडती!

Spread the love

पुणे | आयकर विभागाने पुण्यात छापेमारी सुरू केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्याच सोसायटीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही राहतात. त्यांच्या शेजारीच आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. सकाळपासूनच ही छापेमारी सुरू असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बहीण नीता पाटील या पुण्यातील मोदी बाग सोसायटीत राहतात. त्या गृहिणी असून त्यांचे पती डॉक्टर आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा पुण्यात मोदी बाग सोसायटीतच राहतात. त्यांच्या घराच्या शेजारीच हे छापे सुरु असल्याचं सांगितलं जातं आहे.

आठ तासांपासून छाननी

अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखान्यावरही धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाचे सहा ते सात अधिकारी चार गाड्यातून आले होते. त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवानही होते. पहाटे 6 वाजताच या अधिकाऱ्यांनी कारखान्यावर येऊन छापेमारी केली. तसेच अकाऊंट विभागाशी संबंधित फायली आणि कागदपत्रांची छाननी सुरू केली. गेल्या आठ ते नऊ तासांपासून या ठिकाणी तपासणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

जरंडेश्वरही आयटीच्या रडारवर

सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाने जरंडेश्वर कारखान्यावर छापा टाकल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

डायनॅमिक्स कंपनीत झडती

तर, दुसरीकडे बारामती डायनॅमिक्स कंपनीत अजूनही चौकशी झाडाझडती सुरू आहे. आयकर विभागाचे चार ते पाच अदिकारी ही तपासणी करत आहेत. तसेच सीआरपीएफच्या सहा ते सात जवानांचा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळपासूनच या ठिकाणी चौकशी सुरू असून अनेक दस्ताऐवज तपासली जात आहेत.

काय आहे प्रकरण?

आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.