केसातील कोंडा गंभीर समस्या; चला तर मग बघुयात आयुर्वेदिक फंडा!
संपादकीय;
बाह्य सौंदर्याच्या दृष्टीने केस हा खूप महत्त्वाचा घटक आहे. दाट काळेभोर केस असणे हे सौंदर्यात भर घालणारे आहे. स्त्री असो वा पुरुष चांगले निरोगी केस हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केसांची काळजी त्याची स्वच्छता हे प्रत्येकजण करीतच असतो. मार्केट मधे केसांकरीता भरमसाठ उत्पादने मिळतात. त्याचा किती फायदा होतो हा खरंतर संशोधनाचा विषय आहे. या उत्पादनांच्या जाहिराती इतक्या प्रभावी असतात की एकदा वापरावा अशी भुरळ पडते. केसांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्याकरीता अनेक उत्पादने मार्केटमधे दिसतात. अशीच एक केसांची समस्या म्हणजे केसातील कोंडा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही होणारा. अनेक कारण कोंडा होण्यामागे सापडतात.
आयुर्वेदाचा यावर काय विचार आहे ते बघूया –
आयुर्वेदात केसात कोंडा होणे हा एक क्षुद्ररोग सांगितला आहे. दारुणक या नावाने याचे वर्णन केले आहे. आयुर्वेदानुसार कोणताही व्याधी असो अगदी क्षुद्र ते असाध्य, त्यामागचे कारण आहे त्रिदोषांचा समतोल बिघडणे. दारुणक व्याधीत डोक्यावरील त्वचा रुक्ष होते. त्वचेचे स्फुटन होते खाज सुटु लागते आणि डोक्यावरील त्वचेमधून कोंडा निघू लागतो. त्याचा परीणाम म्हणून केस गळणे केस पांढरे होणे सतत खाज सुटणे अशी लक्षणे दिसू लागतात. कोणताही व्याधी असो त्याच्या उत्पत्तीची कारणे शोधणे खूप महत्त्वाचे असते. निदान परिवर्जन म्हणजेच व्याधी उत्पत्तीच्या कारणांचा त्याग ही प्रथम व महत्त्वाची चिकित्सा आयुर्वेदात सांगितली आहे. केवळ केसात कोंडा झाला म्हणून त्यावर औषधांचा मारा करणे व कारणांचे सेवन करतच राहणे हे व्याधीची पुनरावृत्ती करीत राहणार.
कोंडा तयार कशाने होऊ शकतो?
डोक्यावरील त्वचा खूप तैलीय असेल.
केश धावन न करणे.
दमट रुक्ष वातावरण.
हिवाळ्यासारखा थंड ऋतुमधे साहजिकच त्वचा रुक्ष होते व काळजी न घेतल्यास कोंडा होऊ शकतो.
सतत एसी मधे राहणे त्यामुळे घामच येत नाही व त्वचा रुक्ष होते.
हेअर स्प्रे हेअरड्रायर यांचा सतत वापर.
सोरायसिस सारखे त्वचाविकार.
केमिकल्स चा सतत व अति प्रमाणात वापर.
वारंवार सर्दी पडसे होणे.
आहारात तेल तुपाचे प्रमाण अत्यंत कमी असणे.
योग्य पोषक आहार न घेणे.
अशी अनेक कारणं या समस्येमागे दिसून येतात.
केस विकार उत्पन्न होऊ नये यासाठी prevention म्हणून स्वस्थ दिनचर्या सुद्धा खूप महत्त्वाची. रोज डोक्याला तेल लावणे, नैसगिक वनस्पती चूर्णांनी केस धुणे. नाकात तेल टाकणे, डोक्यावरून गरम पाणी न घेणे हे केसांच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. केस धुतल्यावर कोरडे करणे. उन्हापासून केसांचे रक्षण करणे आवश्यक आहे.
आहारात दूध तूप लोणी आवळा तीळ नारळ इ. द्रव्यांचा वापर.
कोंड्यावर उपाय –
त्रिफळा काढ्याने केस धुणे कोंडा कमी करणारे आहे.
निंबोणी व मेथीदाणे एकत्र वाटून त्याचा लेप कोंडा कमी करणारे आहे.
तक्रधारा (औषधी चूर्णांनी सिद्ध ताक) यावर खूप फायदेशीर ठरते.
चमेलीच्या पानांचा लेप, धावन किंवा सिद्ध तेल त्वचा विकार दूर करणारे आहे.
काही सिद्धतेल सुद्धा कोंडा कमी करण्यास मदत करतात.
रुक्षता वाढल्याने कोंडा होत असेल तर सिद्ध तेलाचा वापर उपयोगी ठरतो.
केसात कोंडा होणे ही समस्या कोणत्या कारणामुळे उत्पन्न झाली त्यानुसार चिकित्सा बदलते. केसांचे आरोग्याकरीता तेल लावणे नस्य केश धावन करण्याचे काढे, लेप नक्कीच फायदेशीर ठरतात.