कास पठार पर्यटनासाठी खुले करावे; पर्यटनप्रेमींनी केली मागणी?
सातारा | उत्तर प्रदेश सरकारने आग्रा हे पर्यटनस्थळ 50 टक्के पर्यटन क्षमतेवर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मग महाराष्ट्रातच पर्यटनावर बंदी का? एका बाजूला एस. टी. बस वाहतुकीला परवानगी दिली आहे. असे असताना कासवरच यायला पर्यटकांना मज्जाव का? फिजिकल डिस्टन्स पाळून मास्क बंधनकारक करून वन विभागाने अतिरिक्त मनुष्यबळ लावून पर्यटकांसाठी व्यवस्था करून जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले कास पठार पर्यटनासाठी खुले करावे, अशी मागणी पर्यटनप्रेमींनी केली आहे.
पठारावर सध्या विविधरंगी फुलांचा बहर चांगलाच जोमात आला आहे. पिवळी स्मिथिया, कावळा, मिकीमाऊस, जांभळा तेरडा, पिवळा तेरडा, लाल तेरडा, सोनकी, महाकाली, अबोली, तुतारी, असितेची आसवं, पांढरा गेंध, धनगर गवत, भुई आर्किड, कंदील पुष्प, कुमुदिनी (छोटे कमळ), जांभळी मंजिरी, कीटकभक्षी, चवर, टूथ ब्रश, डिप कांडी, आभाली, निळी अबोलिमा, पिवळी अबोलिमा, आयपोमिया, स्मिथिया, निलिमा, हॅबनिरीया रारीफ्लोरा, पाचगणी आम्री, बाहुली आम्री, मुसळी, मुरडानिया स्पायरटा, मुलालिया श्रीरंगी, जरतारी, पंद, रानकंद, रानहळद, कॉमेलिना बेघालेनसिस, अंजन, सायनॉटिस फॅस्क्यिुलेटा, सायनॉटिस कोनंकनॅसिस, फ्लेमिंयजिया, केसाळताग, खुळखुळा, भुई आम्री यासह विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले पठारावर बहरली आहेत. निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेल्या कास पठार यंदा करुणा महामारीमुळे सुने सुने आहे.