मराठा समाजास तूर्तास दिलासा; वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती नाही?
नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावरआज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. आता मराठा आरक्षणप्रकरणी 27 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. 27/28 आणि 29 अशी तीन दिवस सुनावणी होईल. कोर्टाने वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती न दिल्याने हा मराठा समाज आणि राज्य सरकारला तूर्तास मोठा दिलासा आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सने आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली.
सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या अंतरिम आदेशावर सुप्रीम कोर्ट काय आदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण आहे. मात्र मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्याने, हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला तांत्रिक अडचणी येत होते. आजच्या सुनावणीत कोर्टाने याचिकाकर्त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी 27, 28, 29 जुलै रोजी वेळ राखीव ठेवला आहे.
प्रवेश प्रक्रियेला स्थगिती नाही | वैद्यकीय प्रवेश प्रकियेला तूर्तास सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती नाही, 90 टक्के प्रवेश प्रकिया पूर्ण झाली आहे. न्यायालयाने सध्यातरी वैद्यकीय प्रवेश प्रकिया स्थगितीवर कुठलाही निर्णय दिलेला नाही