संभाजी बिडी विरुद्धच्या लढाईचा इतिहास

Spread the love

संपादकीय लेख:

महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला एक वेगळीच लोकप्रियता आणि वलय आहे. त्यांचा ज्वलंत इतिहास, शौर्य, पराक्रम, विचार लोकांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात “शिवाजी” आणि “संभाजी” ही नावे कित्येक व्यक्ती, संस्था, नगर, गाव, रस्ते, उद्याने, बांधकामे, उद्योग, व्यवसाय, इत्यादिंना दिलेली पहायला मिळते. ही नावे देण्यामागे देणाऱ्यांचे प्रेम, आदर किंवा स्वार्थ यापैकी काहीही असु शकते. त्यामध्ये जरी महाराजांचा अवमान करण्याच्या किंवा नावाला कमीपणा आणण्याचा हेतू नसला तरी कालांतराने त्याबाबत वाद उपस्थित होतात हे आपल्याकडच्या अनेक घटनांमध्ये दिसून आले आहे. सध्या महाराष्ट्रात “संभाजी बिडी”चा विषय चर्चेत आहे. बिडीसारख्या अंमली पदार्थाला “संभाजी” हे नाव देणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान आहे, त्यामुळे बिडी उत्पादनाला दिलेले संभाजी महाराजांचे नाव बदलावे अशी शिवप्रेमींकडुन मागणी होत आहे आणि ती रास्त आहे.

बिडीच्या उत्पादनाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि बंडलावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र छापायला सुरुवात कुणी केली हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. कारण त्या काळामध्ये पुण्यातील “शिवाजी विडी वर्क्स”चे वल्लभभाई दलाभाई पटेल, “श्री शिवाजी मराठा विडी वर्क्स”चे जहागीरदार आणि “छत्रपती विडी वर्क्स”चे रघुनाथ साबळे या बिडी उत्पादकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि चित्र वापराच्या अधिकारावरुन अनेकदा एकमेकांसोबत वाद झाले होते आणि ते कोर्टकचेऱ्यांमध्येही गेले होते. परंतु इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चित्र तर इतिहाससंशोधक वा.सि.बेंद्रे यांनी १९३३ मध्ये शोधले आणि उजेडात आणले; त्यानंतरच महाराष्ट्राला शिवराय कसे दिसायचे हे समजले. त्यामुळे त्यापूर्वी जे बिडी उत्पादक शिवरायांचे चित्र हा आपलाच ट्रेडमार्क असल्याचे दावे करुन जो वाद घालत होते तो वाद किती निराधार होता हे स्पष्ट होते.

आज “संभाजी बिडी” वरुन जो वाद सुरु आहे त्याची सुरुवात रघुनाथ रामचंद्र साबळे यांच्यापासून होते. १९३२ मध्ये रघुनाथ साबळेंनी आपला विडी व्यवसाय सुरु केला. त्यांनी आपल्या बिडी उत्पादनाला “शिवाजी बिडी”, “छत्रपती बिडी” अशी नावे दिली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित झाल्यानंतर त्यांनी बिडी बंडलावर महाराजांचे चित्र छापले. महाराजांच्या नाव आणि चित्रामुळे त्यांचा व्यवसाय प्रचंड वाढीस लागला. त्यामुळे २५ नोव्हेंबर १९३८ रोजी त्यांनी आपल्या बिडी उत्पादनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि चित्र ट्रेडमार्क करुन घेतले.

१९४३ मध्ये रघुनाथ साबळे यांचे निधन झाले. पुढे त्यांचे पुत्र शंकर साबळे यांनी हा व्यवसाय आपल्या हातात घेतला आणि पुण्यात आपले वर्कशॉप सुरु केले. तेथे त्यांची ओळख तपकिर आणि तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्या हरिभाऊ मारुती वाघिरे यांच्याशी झाली. १८ ऑक्टोबर १९४४ रोजी शंकर साबळे आणि हरिभाऊ वाघिरे यांनी भागदारीमध्ये “साबळे वाघिरे आणि कंपनी” सुरु केली. १ सप्टेंबर १९५० पासुन भारतात “Emblems & Names (Prevention of Improper Use) Act 1950” हा कायदा लागू झाला. या कायद्याच्या कलम 9A मध्ये नोंद असणाऱ्या राष्ट्रीय प्रतीके आणि व्यक्तिमत्त्वांच्या नावाचा कॅलेंडर वगळता इतर ठिकाणी व्यावसायिक व व्यापारविषयक कारणांसाठी गैरवापर करता येणार नाही असे नमूद करण्यात आले. १६ मार्च १९६८ रोजी केंद्र सरकारने एक सुचनापत्र काढले, त्यानुसार या कायद्याच्या कलम 9A मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा समावेश केला आणि चित्रमय दर्शन हा शब्द जोडण्यात आला. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि चित्र या दोन्हींच्या व्यावसायिक कारणासाठी होणाऱ्या गैरवापरावर बंदी आणण्यात आली.

व्यावसायिक कारण सांगुन साबळे वाघिरे आणि कंपनीने शिवाजी महाराज हे ट्रेडमार्क ३१ मार्च १९७२ पर्यंत वापरण्याची सरकारला परवानगी मागितली, पण सरकारने त्यांना ३१ मे १९६९ पर्यंतच हे ट्रेडमार्क वापरण्याची मुदत दिली. ही मुदत संपल्यानंतर जॉईंट रजिस्ट्रार ऑफ ट्रेडमार्क यांनी १६ ऑक्टोबर १९६९ रोजी एक नोटीस काढून Emblems & Names (Prevention of Improper Use) Act 1950 आणि Merchandise Marks Act, 1958 नुसार
साबळे वाघिरे आणि कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व चित्र वापरायला बंदी घातली. त्यावर हरकती मागवल्या.

यावर साबळे वाघिरे आणि कंपनीने वेळ मागून घेतला आणि Emblems & Names (Prevention of Improper Use) Act 1950 कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आणि त्यातील तरतुदींना आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात रीट पिटीशन दाखल केली. तसेच १६ ऑक्टोबरच्या १९६९ च्या बंदीच्या नोटिसला आव्हान देऊन ही नोटीस रद्द करण्याची विनंती केली. २१ मार्च १९७५ रोजी सुप्रीम कोर्टाने आपला अंतिम निकाल देत साबळे वाघिरे आणि कंपनीची याचिका फेटाळून लावली आणि बंदीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे साबळे वाघिरे आणि कंपनीला कायद्यापुढे गुडघे टेकावे लागले आणि आपल्या बिडी उत्पादनावरुन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व चित्र हटवावे लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या बिडी उत्पादक कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांकडे आपला मोर्चा वळवला. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव व चित्र बिडीच्या बंडलावर छापून सर्रासपणे विक्री सुरु केली. तोपर्यंतच्या काळात इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांची रंगवलेली चुकीची प्रतिमाच प्रचलित असल्याने समाजातुन याविरुद्ध उठाव झाला नाही. हळूहळू संभाजी महाराजांच्या चरित्राचे संशोधन व्हायला लागले. खरा इतिहास समोर यायला लागला. तरुणांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण वाढायला लागले. लोक जागृत व्हायला लागले. एका निर्व्यसनी राजाच्या नावाने बिडीची विक्री चुकीची असल्याचे मत जनमानसांत बनू लागले.

२००३ च्या जेम्स लेन प्रकरणानंतर उघडपणे इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज व्यक्त व्हायला लागली. इतिहासकारांनी विविध आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केलेल्या संभाजी महाराजांवरील आरोप खोडून काढण्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन व्हायला लागले. कधी नव्हे तो शिवप्रेमी वर्ग जागृत बनला. चुकीच्या इतिहासावर, गोष्टींवर बोलू लागला, लिहू लागला. प्रसंगी आक्रमक होऊ लागला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर उभ्या राहिलेल्या संभाजी ब्रिगेडने २००९ साली “संभाजी बिडी” या विषयाला हात घातला. समाजात जनजागृती सुरु केली. डिसेंबर २०११ मध्ये साबळे वाघिरे आणि कंपनीला बिडीच्या बंडलावरुन छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आणि चित्र हटवण्याबाबत इशारा दिला. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर कंपनीने आपल्या बिडीच्या बंडलावरुन छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र आणि छत्रपती हा शब्द टप्प्याटप्प्याने हटवण्याचा निर्णय घेतला आणि २०१३ पर्यंत तो अंमलात आणला.

आता पुन्हा एकदा संभाजी बिडीचा विषय ऐरणीवर आला आहे. साबळे वाघिरे आणि कंपनीने बिडी उत्पादनाला दिलेले संभाजी हे नाव बदलावेच या मागणीने जोर धरला आहे. शिवप्रेमींनी उपोषण, आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.

८ सप्टेंबर २०२० रोजी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने पुण्यात साबळे वाघिरे आणि कंपनीच्या संचालकांची भेट घेतली. २०११ मध्ये त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली तसेच त्यांनी त्यावेळी संभाजी ब्रिगेडला दिलेले पत्र दाखवले. आपल्याला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे, परंतु यावेळी राज्याच्या सर्व भागांतील शिवप्रेमींच्या भावना तीव्र असुन कंपनीला आपले व्यावसायिक नुकसान आणि ६०-७० हजार कामगारांच्या प्रपंचाची काळजी असेल तर कोणत्याही परिस्थितीत बिडी उत्पादनाचे “संभाजी” हे नाव बदलणे हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर राहिल्याचे त्यांना पटवून दिले. संभाजी ब्रिगेड चर्चेच्या माध्यमातून हया प्रश्न सोडवू इच्छित आहे, त्यामुळे कायदा हातात घेण्याची वेळ येऊन देऊ नका असा इशाराही या शिष्टमंडळाने दिला. साबळे वाघिरे आणि कंपनी जर नाव बदलायला तयार असेल, तरच संभाजी ब्रिगेड त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेईल असेही ठणकावून सांगण्यात आले. त्यानंतर साबळे वाघिरे आणि कंपनीच्या संचालकांनी आपसात चर्चा करुन दोन दिवसात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपला बिडी उत्पादनाच्या नाव बदलाबाबतचा निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे लवकरच आनंदाची बातमी ऐकायला मिळेल अशी आशा आहे.

हे सगळं वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्याला समजली असेल की Emblems & Names (Prevention of Improper Use) Act 1950 कायद्यातील 9A मध्ये म्हणजेच थोडक्यात राष्ट्रपुरुषांच्या यादीत जर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश झाला, तर त्यांच्या नावाचा व्यावसायिक आणि व्यापारविषयक कारणांसाठी होणाऱ्या गैरवापरावर आपोआप आळा बसेल. त्यासाठीही शिवप्रेमींनी शासनाकडे मागणी आणि पाठपुरावा केला पाहिजे..

– अनिल माने.

(लेखाविषयी आपल्या सूचना, माहिती व प्रतिक्रियांचे स्वागत आहे.)

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.