राम मंदिर भूमीपूजनाचा आज ऐतिहासिक सुवर्ण दिवस: अयोध्या नगरी सजली!
अयोध्या | अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून आज ५ ऑगस्ट ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ९.३५ वाजता दिल्लीहून अयोध्येला रवाना होतील. साधारण ११.३० वाजता अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर हनुमानगढी येथे पोहोचून ते दर्शन आणि पूजा करतील. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासूनच अयोध्येत भक्तांची गर्दी वाढली आहे. अयोध्येत घर आणि मंदिरांना रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केल्याने अक्षरशः दिवाळीचे स्वरुप आले आहे.
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. अद्ययावत गाड्या आणि सुरक्षा ताफ्याची अयोध्येच्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात आली. साकेत महविद्यालयाच्या मैदानात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंचावर पाच मान्यवरांना स्थान असेल. मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास हे मंचावर असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीराम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम रूपरेषा :-
सकाळी ९.३५ वा. – दिल्लीतून प्रस्थान
सकाळी १०.३५ वा. – लखनौ विमानतळावर आगमन
सकाळी १०.४० वा. – हेलिकॉप्टरने अयोध्येकडे प्रस्थान
सकाळी ११.३० वा. – अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर आगमन
सकाळी ११.४० वा. – हनुमानगढी येथे पोहोचून दर्शन आणि पूजा
दुपारी १२.०० वा. – राम जन्मभूमी परिसरात आगमन
दुपारी १२.१५ वा. – राम जन्मभूमी परिसरात वृक्षारोपण
दुपारी १२.३० वा. – श्रीराम मंदिर भूमिपूजन
दुपारी १२.४० वा. – श्रीराम मंदिर पायाभरणी
दुपारी ०२.०५ वा. – साकेत कॉलेज हेलिपॅडकडे प्रस्थान
दुपारी ०२.२० वा. – हेलिकॉप्टरने लखनौकडे प्रस्थान, लखनौहून दिल्लीसाठी प्रस्थान
विशेष पवित्र माती आणि जल अयोध्येत पोहोचले:-
भूमिपूजनाला देशातील ३६ परंपरांचे १३५ संत उपस्थिती लावणार आहेत. जवळपास १५०० ठिकाणांहून माती आणि २००० ठिकाणांहून पवित्र जल अयोध्येत नेण्यात आले आहे. हनुमान गढीवर पताका चिन्हाचे पूजन करण्यात आले आहे.