पुण्यात रंगले फ्लेक्स वॉर; अजित पवार कारभारी लय भारी, तर फडणवीस पुण्याचे शिल्पकार!

पुणे | पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ असतानाच पुण्यात फ्लेक्स वॉर रंगलेलं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस एकाच दिवशी (22 जुलै) असतो. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अजित पवारांना तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स शहरात लावण्यात आले आहेत.
‘शिल्पकार नव्या पुण्याचे नेतृत्व नव्या महाराष्ट्राचे’, ‘विकासपुरुष’, ‘अद्वितीय कर्तृत्व आक्रमक नेतृत्व’ अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे ‘कारभारी लय भारी’, ‘बोले तैसा चाले’, ‘कृतीशील विचारांचा गतीशील नेता,’ ‘पुण्यनगरीचा विश्वास दादा म्हणजेच विकास’ अशा शब्दांमध्ये अजित पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. अलका टॉकिज चौकामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीकडून शेजारी शेजारी फ्लेक्स लावले आहेत. शहरात करण्यात आलेली फ्लेक्सबाजी पुणेकरांच्या चर्चेचा विषय झाली आहे. या फ्लेक्सबाजीवर आता दोन्ही बाजूने टीका देखील केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्या फ्लेक्सचा फोटो ट्वीट करुन त्यावर टीका केली. ‘आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त’ असं म्हणत मिटकरी यांनी फडणवीस यांच्या फ्लेक्सचा फोटो ट्विट केला आहे.
तर दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मिटकरी यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. ‘आमदार पडळकर यांनी दिलेली उपाधी किती चपखल लागू होते, हे अमोल मिटकरी यांनी या ट्विटने दाखवून दिलंय. पुण्यात काय चाललंय, याची तसूभरही माहिती नसताना केवळ आमदारकी दिलेल्यांना खूश करण्यासाठी वाट्टेल ते बोलायचं, हे पुणेकरांना कसं पटेल?’ असं मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
‘साडेचार वर्षांत पुणे भाजपला काही करता आले नाही‘
भाजपने लावलेल्या फ्लेक्सवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली जगताप म्हणाले, “भाजपचे हे सगळे फ्लेक्स हास्यस्पद आहेत. गेल्या साडेचार वर्षांमध्ये पुणे भाजपला काही करता आले नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करुन विकास पुरुष, नव्या पुण्याचे शिल्पकार म्हणून त्यांना दाखविण्यात येतंय.” भाजपने पुण्यात भ्रष्टाचाराशिवाय काहीच केलेलं नाहीये. त्यामुळे येत्या निवडणुकीत पुणेकर आपल्याला विचारतील तेव्हा काय तोंड दाखवायचं म्हणून नवे शिल्पकार, विकासपुरुष असे फ्लेक्स लावले जात आहेत.”
पुढच्यावर्षी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका
फेब्रुवारी 2022 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. गेली साडेचार वर्षे पुणे महानगर पालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यापूर्वी पुणे महानगर पालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. पालिका निवडणुक तोंडावर असल्याने शहरात राजकारण रंगू लागले आहे. नुकताच पुणे महानगरपालिकेमध्ये नवीन 23 गावांचा समावेश करण्यात आला. याबाबतचा अध्यादेश राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे. पुण्याच्या उपनगरांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी या गावांचा समावेश करण्यात आला अशी टीका करण्यात येत होती.
तर भाजपकडून देखील नवीन योजना पुण्यात राबविण्यात येत आहेत. नुकताच मध्यवस्तीतील नागरिकांसाठी 10 रुपयांमध्ये एसी बससेवा पालिकेडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले होते. राज ठाकरेंकडून देखील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. गेले दोन दिवस राज ठाकरे पुण्यात असून विविध मतदारसंघामध्ये त्यांच्याकडून बैठका घेण्यात येत आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण हे देखील पुणे दौऱ्यावर आले होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील पुण्यात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.