महाराष्ट्रात अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधकांचे उपोषण; रावसाहेब दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा!

नवी दिल्ली | संसदेच्या अधिवेशनात काल शेतकरी कृषी बिलावरून गोंधळ माजला होता. आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आता भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अप्रत्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर करण्यात आले आहे. शेतकरी कृषी बिल हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.
महाराष्ट्रामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक आंदोलन आणि उपोषण करण्याची भाषा करतात.” अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. “एमएसपीच्या आधारावरच शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना MSP जरी बंधनकारक नसेल; परंतु एमएसपीच्या खाली शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा असे कुठे लिहिले आहे का?” असा सवालही दानवेंनी विरोधकांना विचारला.
विशेष म्हणजे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची कृषी भवन येथे भेट घेतली. या भेटीत साखर उद्योग, कृषी विधेयक बिलावर चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दानवे यांनी ही टीका केली.