बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारच मोठा निर्णय; या पुढे 2 डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश!
मुंबई | बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे 2 डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आधी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचं सर्टिफिकेट घेतलं जातं. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असं टोपे म्हणाले.
निर्बंधात शिथिलता नाही..
राज्यात बऱ्यापैकी लसीकरण झालं आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली जाईल आणि लोकल ट्रेनही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येतील अशी चर्चा होती. मात्र, कॅबिनेटने निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात दररोज 7 ते 9 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
10 जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण..
राज्यातील एकूण 92 टक्के रुग्ण संख्या केवळ दहा जिल्ह्यात आहे. मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
सव्वा चार कोटी लस मिळाव्यात..
देशात 42 कोटी लस येणार आहे. ऑगस्टमध्ये महाराष्ट्राला चार सव्वाचार कोटी लस मिळायला हव्यात. लोकसंख्येच्या प्रमाणात लस देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला मोठ्या प्रमाणावर लस येतील, असंही ते म्हणाले.