यंदा राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा ‘बारामतीकरावर’ !
बारामती | राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पक्षाने आपल्या संघटना मजबूत करण्यावर चांगलाच भर दिलेला आहे. अशातच गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी पन्नास जणांच्या मुलाखतीही पार पडल्या. मुलाखतीनंतर अनेक नावांची चर्चा चांगलीच रंगली मात्र या चर्चेत मोहसिन पठाण यांचं नाव सगळ्यांनाच वरचढ ठरलं.
मोहसिन पठाण हे विद्यार्थी संघटनेत १० वर्षांपासून कार्यरत आहेत. नोकरी उपलब्ध करून द्या अथवा शैक्षणिक कर्जमाफी करण्याचे त्यांचं आंदोलन प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पठाण यांनी ८०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे तर ३ हजारहून अधिक कुटुंबियांना आर्सेनिक अल्बम औषधांचे वाटप केल्याने सर्वसामान्य लोकांवर पठाण यांचं ‘गारुड’ पसरलं आहे.
प्रदेशाध्यक्ष पदासाठीच्या मुलाखती झालेल्या आहेत. मोहसिन पठाण हे खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते असल्याने हे प्रदेशाध्यक्ष पद बारामतीच्या वाट्याला येणार असल्याची चर्चा आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी पक्ष राब राब राबणाऱ्या कार्यकर्त्याला विचारात घेणार की घराणेशाहीला जपणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.