Spread the love

कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला आला म्हणताना तो पुन्हा अचानक वाढला. आता तो पुन्हा आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र आहे. सगळ्या जगालाच आता कोरोनापूर्व काळाप्रमाणे जीवन कधी सुरू होतंय, याची आतुरता आहे; मात्र जगाच्या अनेक भागांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी ठरवण्यात आलेले प्राथमिक उपाय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता, मास्क वापरणं आदींची अंमलबजावणी कठोरपणे करण्यास पर्याय नाही. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने अधिक प्रभावी उपायांच्या शोधात आहेत.

‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा’च्या  ताज्या अभ्यासातून असं स्पष्ट झालं आहे, कि मास्क परिधान करणं आणि चांगल्या प्रकारचं वायुविजन असणं  या दोन गोष्टी सोशल डिस्टन्सिंगपेक्षाही महत्त्वाच्या आहेत. शाळा आणि कॉलेजेस पूर्ण क्षमतेने खुल्या करण्याचा विचार करताना संशोधनात सापडलेली ही गोष्ट महत्त्वाची ठरू शकते. फिजिक्स ऑफ फ्लुइड या जर्नलमध्ये या नव्या संशोधनाविषयीचा लेख प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनासाठी विद्यार्थी आणि शिक्षक असलेल्या एका वर्गखोलीचं कम्प्युटर मॉडेल तयार करण्यात आलं. त्यात हवेचा प्रवाह ठराविक ठेवण्यात आला आणि त्यात रोगाचा प्रसार होण्याच्या धोक्याची स्थितीही राखण्यात आली.

ही वर्गखोली 709 चौरस फूट क्षेत्रफळाची होती आणि तिच्या भिंती 9फूट उंचीच्या होत्या. वर्गखोलीच्या पुढच्या भागात शिक्षक होता आणि वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क घातला होता. यातला कोणीही विद्यार्थी कोरोनाचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता होती. या वर्ग खोलीचा अभ्यास दोन शक्यतांच्या आधारे करण्यात आला. पहिल्या शक्यतेत खोलीतलं वायुविजन चांगलं होतं. म्हणजेच हवा खेळती होती. दुसऱ्या शक्यतेत हवा खेळती राखण्यात आली नव्हती. बंद खोलीत संसर्गाची शक्यता किती आहे ते समजून घेण्यासाठी वापरलं जाणारं वेल्स रिले अँड कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स मॉडेल तसंच कार्स आणि विमानांच्या एरोडायनॅमिक्सचा अभ्यास करण्यासाठी वापरलं जाणारं कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक मॉडेल  या अभ्यासासाठी वापरण्यात आलं.

या संशोधनाच्या निष्कर्षांतून अनेक गोष्टी समोर आल्या. मास्क घातलेले असतील, तर एअरोसोल्स म्हणजेच रोगजंतू वहन करणारे हवेतले अत्यंत सूक्ष्म घटक थेट शरीरात प्रवेश करू शकत नाहीत. मास्कमुळे उच्छ्वासावेळी तयार झालेल्या उष्ण हवेमुळे एअरोसोल्सशी संबंध येत नाही. कारण उष्ण हवेमुळे एअरोसोल्सचा प्रवास वरच्या दिशेने होतो आणि विद्यार्थ्याच्या जवळून ते घटक लांब जातात. तसंच,खोलीत चांगलं वायुविजन असेल आणि एअर फिल्टरेशनची  चांगली सोय असेल,तर अशी सोय नसलेल्या स्थितीच्या तुलनेत संसर्गाचा धोका 40 ते 50 टक्क्यांनी घटल्याचं लक्षात आलं. जेव्हा दोन मॉडेल्सची तुलना करण्यात आली, तेव्हा वेल्स रिले आणि कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स या दोन्ही मॉडेल्सचे निष्कर्ष वायुविजन नसलेल्या स्थितीत सारखेच होते; पण वायुविजन असलेल्या स्थितीत संसर्गाची शक्यता 29 टक्के कमी असल्याचं वेल्सरिले मॉडेलने सांगितलं.

संसर्गाच्या शक्यतांचा अधिक अभ्यास करण्यासाठी कम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स मॉडेलमधून निघालेल्या गुंतागुंतीच्या निष्कर्षांचाही अभ्यास केला पाहिजे, असंही अभ्यासाअंती स्पष्ट करण्यात आलं आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.