तर..26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा!
औरंगाबाद | मराठा आरक्षणावरील स्थगिती जर 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर 26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने यापुढील लढाई रस्त्यावर उतरुन लढू, अशी भूमिका स्पष्ट केली. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी राज्य सरकारने EWS च्या आरक्षणाची घोषणा केली होती. EWS चं आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजीतल रोष कमी होईल, असा राज्य सरकारचा मानस होता. मात्र सरकारच्या निर्णयानंतर मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “EWS आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते किंबहुना आमच्या 42 बांधवांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं.
जर 25 तारखेला आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर 26 तारखेपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि या सरकारमधील मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”, अशी आक्रमक भुमिका रमेश केरे पाटील यांनी मांडली. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही. म्हणून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण केला जात आहे. मंत्री शपथ घेताना संविधनाला साक्ष ठेवून कोणत्याही समाजाप्रति सूडाची भावनी ठेवणार नाही, असं सांगतात. मग आरक्षणाप्रसंगी एका समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकतात”, असं म्हणत केरे पाटील यांनी वडेट्टीवार, भुजबळ यांच्यावर टीका केली.
“सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची किंबहुना आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार वारंवार अपयशी ठरत आहे, असं सांगताना मराठा समिती्च्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी व्हावी आणि त्यांच्या जागेवर मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा बाळासाहेब थोरात यांपैकी कुणाचीही नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी करावी”, अशी मागणी यावेळी केरे पाटील यांनी केली.