महामेट्रोच्या बातमीचा दणका; विधानसभा अध्यक्षांनी अन्न पुरवठा विभागाकडे केला पाठपुरावा!
बार्शी | पनवेल पोलिसांच्या कारवाईनंतर बार्शीतील रेशनचा धान्य घोटाळा राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. पनवेल पोलिसांनी बार्शीत चौकशीसाठी धाव घेतल्यानंतर बार्शी पोलिसांनीही व्यापाऱ्यांच्या गोदामात आणि दुकानात छापा टाकत काटा काढण्याचं काम हाती घेतलंय. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या धान्य घोटाळ्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी बार्शीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. आता, विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवळ यांनी याप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिले आहे.
बार्शीतील शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष ताटे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर जाऊन विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, राज्यात गाजत असलेल्या बार्शीतील धान्य घोटाळ्यावर चर्चा करुन, घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी करणारे पत्रही झिरवळ यांना देण्यात आले. त्यावेळी, बार्शीतील धान्य घोटाळ्यासंदर्भात नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी झिरवळ यांनी फोनवरुन बोलणी केली, याप्रकरणी सखोल तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याचेही बजावल्याचे शिरीष ताटे यांनी बार्शी टाईम्सशी बोलताना म्हटले. तसेच, झिरवळ यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनाही पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, स्वस्त धान्य दुकानातील या गंभीर स्वरुपाच्या काळ्या-बाजाराबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, काळ्या बाजारातील रेशन धान्य घोटाळ्याच्या तपासांतर्गत पोलिसांनी कारवाई सुरू केली असून 10 दिवसांत अनेक दुकानातून मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईविरोधात बार्शी बाजार समितीमधील ‘द मर्चंट असोसिएशनने’ बेमुदत बंद पुकारला होता. मात्र, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, भाजपा नेते आणि गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे व पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर आडत व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतला.