Spread the love

संपादकीय;-

वर्षानुवर्षे राज्याचा विकास विकेंद्रित पद्धतीने झालेला नाही आणि पुणे, मुंबई , नाशिक या तीन शहरांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला गोल्डन ट्रॅन्गल  किंवा सुवर्ण त्रिकोण असे संबोधले जाते. कारण या तीन शहरांमध्ये  असलेल्या भूभागात राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीपैकी बहुतांश गुंतवणूक होते, असे लक्षात आले आहे. विकास समतोल झालेला नसल्याने विकासाचे अनुशेष बाकी आहेत. विदर्भ-मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष अजूनही भरून काढण्यात आलेला नाही. त्यावर अगदी मागच्या पिढीतले अर्थतज्ज्ञ, केंद्र सरकारचे सल्लागार असलेले वि. म. दांडेकर यांच्यासह इतरही मोठमोठ्या तज्ज्ञांच्या समित्या नेमल्या गेल्या; पण अनुशेष कायम आहे. याला कारण तज्ज्ञांनी सूचना केल्या तरी त्या अमलात आणायला राजकीय इच्छाशक्ती लागते. ती दाखवली जाते का, हा खरा प्रश्न आहे.

सध्याच्या कोरोनासंसर्गाच्या काळात याच राजकीय इच्छाशक्तीबद्दलचा संदर्भ शुक्रवारी समोर आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीच्या वेळी उपमुख्यमंत्रिपदाचाही कार्यभार असलेले अर्थमंत्री अजित पवार आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी परस्परांना चिमटे काढले आणि चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हसले. प्रसारमाध्यमांमध्ये मुख्यमंत्र्यांचा हसरा फोटो पंढरपूरच्या पूजेच्या वेळी किंवा कोणाचा तरी सत्कार वगैरे करतानाच दिसतो. एरवी त्यांच्या चेहऱ्यावर कोरोनाचे आणि इतर कंगनासह सर्व प्रकारची संकटे सहजपणे दिसत असतात. पण अजित पवार आणि जयंत पाटील यांचे किमान मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणल्याबद्दल तरी अभिनंदन करायला हवे. सध्याच्या करोना संसर्गाच्या आणि कंगनाग्रस्ततेच्या काळात तेवढाच थोडासा रिलीफ. आता तुम्हाला जिज्ञासा असेल की मुळात अजित पवार आणि जयंत पाटील यांनी असं काय केलं की उद्धव ठाकरे हसले. तर तेही सांगतो.

व्हिडियो कॉन्फरन्समधे मुख्यमंत्री मुंबईतून, अजित पवार पुण्यातून आणि जयंत पाटील सांगलीतून सहभागी झाले होते. सांगलीत करोनावरच्या उपाययोजनांसाठी वाढीव निधी पाटील यांनी मागितला. त्यावर अजित पवार यांनी जयंत पाटील यांना ते पूर्वी अर्थमंत्री होते, याची आठवण करून दिली तीही पुणेरी शैलीत. माजी अर्थमंत्र्यांनी पैसा उभा करण्यासाठी काय करावं, हे अजितदादांनी खास त्यांच्या शैलीत सांगितलं आणि पाटील यांच्या इच्छाशक्तीला आव्हान दिलं. पुण्यात आम्ही रस्त्यावर थुंकणारे आणि मास्क न घालणारे यांना दंड लावून पावणेआठ कोटी वसूल केलेत, तसे तुम्ही करा. म्हणजे निधी मागायची वेळ माजी अर्थमंत्र्यांवर येणार नाही, असं पवार म्हणाले. त्यावर त्यांच्या विधानसभा भाषणांमधे प्रत्ययास येणाऱ्या मिष्कील शैलीत जयंत पाटील म्हणाले की अर्थमंत्र्यांना होत असलेल्या त्रासाची आम्ही नोंद घेतलीय. सांगलीतही अंमलबजावणी करू. पाटील यांच्या टिप्पणीवर हशा उसळला आणि त्यात मुख्यमंत्रीही सहभागी झाले.

खरी बातमी पुढेच आहे. जयंत पाटील यांनी अशीही मागणीही या बैठकीत केली की शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळा दंड आकारला जातो तो राज्यभर एकसमान असावा. मलबार हिलवरचा माणूस सार्वजनिक ठिकाणी थुंकला तरी हजार रुपये आणि गडचिरोलीत सुदूर भागातला माणूस थुंकला तरी हजार रुपये अशी एकसमानता आली तर काय होईल. लोकांच्या तोंडचे पाणी करोनामुळे पळाले आहेच आता सरकारी दंडांमुळेही पळेल. या साऱ्या कथेचे तात्पर्य काय तर मीही कधी तरी हसतो, तुम्हीही हसा, आपण सारे हसू शकतो. हसल्यानं क्षणभर दुःखाचा विसर पडतो. तुम्हालाही पडेल. आपण सारे हसू आणि करोनाला घालवू, घालवू म्हणजे घालवणारचं कारण आपण सारे….पुढचं तुम्हाला माहीत आहेच.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.