आज भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक; हे ठराव मांडले जाणार?

Spread the love

मुंबई | आज महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक संपन्न होणार आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात सकाळी १० वाजेपासून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह कार्यकरिणीला सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी कार्यसमितीची बैठक होणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेले एकनाथ खडसेंची उद्या कार्यकरिणीला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी खुद्द दिली आहे. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून बैठकीत राज्याच्या राजकीय परिस्थितीसोबत महिलांवरिल वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चर्चा करण्यात येईल. शेतकरी व कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांबाबत बैठकीत ठराव संमत करण्यात येतील. कोरोनामुळे  कार्यसमितीची बैठक व्हर्चुअल स्वरुपात होईल व राज्यातून ठिकठिकाणाहून कार्यसमिती सदस्य बैठकीत ऑनलाईन सहभागी होतील.

बैठकीचे उद्घाटन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाने होईल. ते दिल्ली येथून ऑनलाईन सहभागी होतील. बैठकीचा समारोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतील. कार्यसमिती बैठकीपूर्वी नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी बैठक होईल. या बैठकीचे उद्घाटनपर भाषण पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल. संतोष करतील. पदाधिकारी बैठकीचा समारोप राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीष यांच्या मार्गदर्शनाने होईल.

दरम्यान, या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ठराव मांडण्यात येईल. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बेपर्वाईमुळे मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करण्यात येईल. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून त्याबाबत ठराव मांडण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे व गोंधळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार राजकीय ठरावात करण्यात येईल. तसेच शेती क्षेत्रात सुधारणा करणारे कायदे मोदी सरकारने नुकतेच केले आहे. कामगार कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. याविषयी ठराव मांडून मोदी सरकारचे अभिनंदन करण्यात येईल. प्रदेश कार्यसमिती बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारीपदी नियुक्त झालेल्या विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर व सुनिल देवधर या नेत्यांचादेखील सत्कार करण्यात येईल.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.