जीओची नवीन टेक्नॉलॉजी; व्हिडिओ कॉलसाठी एक पाऊल पुढे!
मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीज’ने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘जियो ग्लास’ हे महत्त्वाकांक्षी प्रॉडक्ट लाँच केले. ‘जियो ग्लास’ने सामान्य ऑफिस कॉलला एका नाविन्यपूर्ण स्तरावर नेले आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश आणि इशा अंबानी यांनी ही योजना जाहीर केली. जियो ग्लास या नवीन मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेटमुळे ऑनलाइन व्हिडिओ कॉल अत्यंत सुलभतेने होऊ शकेल. या नवीन उत्पादनासह कंपन्या स्वत:च्या थ्रीडी आकृतीसह होलोग्राफिक व्हिडिओ कॉल करु शकतात आणि त्याच वेळी एखादे सादरीकरणही (प्रेझेंटेशन) करु शकतात.
“जियो ग्लास ही आपणास एक विस्मयकारक अनुभव देण्यासाठी मिक्स्ड रिअॅलिटीतील उत्कृष्ट श्रेणी प्रदान करते. कुठल्याही बाह्य अॅक्सेसरिजशिवाय स्पेशल आणि पर्सनलाईज्ड ऑडीओ सिस्टम सुरु केली आहे” असे रिलायन्सचे उपाध्यक्ष किरण थॉमस म्हणाले.
जियो ग्लासचे वजन केवळ 75 ग्रॅम आहे. एकाच केबलद्वारे कनेक्ट करता येते. यात आधीपासूनच 25 इनबिल्ट अॅप्स आहेत. यामध्ये वास्तववादी व्हिडिओ मीटिंग्ज करता येतील.
जियो ग्लासमुळे शिक्षक आणि विद्यार्थी 3डी व्हर्च्युअल रुममध्ये एकत्र येऊ शकतात. रिअल टाईममध्ये जियो मिक्स्ड रिअॅलिटी क्लाऊडमध्ये होलोग्राफिक वर्ग आयोजित करता येतील. किराणा दुकान यापुढे मर्यादित उत्पादन श्रेणी, जागा किंवा वितरण आव्हानांद्वारे मागे राहणार नाहीत. JioMart सोबत भागीदारीमुळे किराणा स्टोअर्सना व्यवसाय आणि उत्पन्न वाढवण्यात मदत होईल, असे इशा अंबानी म्हणाल्या. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं पहिली व्हर्चुअल आणि 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.