बीड जिल्ह्याचा विकास निधी बारामतीला गेलाच कसा?; खासदार प्रीतम मुंडे यांचा सवाल!

Spread the love

बीड | सध्या राज्य सरकारकडे कोणत्याही घटकासाठी निधी नाही अशी ओरड होत आहे. राज्य सरकारकडे निधीच नाही तर मग बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो? असा सवाल बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे. हे करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याचा निधी बारामतीच्या विकासासाठी पळवल्याचा आरोपही केला आहे. प्रीतम मुंडे म्हणाल्या की, “सध्या राज्य सरकारकडे कोणत्याही घटकासाठी निधी नाही अशी ओरड होत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांच्या मदतीसाठीदेखील राज्य सरकारकडे पैसे नाहीत. एवढंच नाही तर कोरोना महामारीशी लढण्यासाठीदेखील सरकारकडे निधी नाही. केंद्राने दिलेल्या निधीवरच लोकांवर उपचार केले जात आहेत. सरकारकडे निधीच नाही तर मग बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो?”

महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात आज बीडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. खासदार प्रीतम मुंडेंच्या उपस्थितीत बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर हे आंदोलन करण्यात आले. याच वेळी उमेदच्या महिला कर्मचाऱ्यांनीही आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रीतम मुंडे यांनीच केले. प्रीतम मुंडे यांच्यासह महिलांनी तब्बल दोन तास जिल्हाधिकारी काचेरीसमोर ठिय्या मांडला होता. यावेळी आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

पीडित महिलेचा प्रीतम मुंडेंसमोर आक्रोश

या आंदोलनावेळी प्रीतम मुंडे लोकांशी बोलत असताना एक पीडित महिला प्रीतम मुंडेंजवळ आली. थेट माईक हातात घेऊन तिने तिची आपबिती सर्वांपुढे मांडली. बोलत असताना पीडित महिलेने अक्षरशः हंबरडा फोडला. यावेळी खासदार मुंडे यांनी सदर महिलेचं सांत्वन करुन तिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.