पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांत बदल्यांवरून अस्वस्थता?
मुंबई | गेल्या दोन महिन्यांत चार वेळा मुदतवाढ दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धुरळा एकदा उडाला. गृह विभागाने बुधवारी रात्री १२ वाजता राज्यातील १०५ पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. भाजपशी जवळीक केल्याच्या रागातून अनेक अधिकाऱ्यांची वर्षभरातच उचलबांगडी केली आहे. अनेक अधिकाऱ्यांनी आज मुंबईची वाट धरून न्यायालयात (मॅट कोर्टात) दाद मागण्यासाठी अर्ज केला आहे. यातील १० हून अधिकाऱ्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली नाही. गृह खाते आणि मंत्रालयातील बदल्यांवरून वाद विकोपाला गेल्याची चर्चा आहे. प्रचंड राजकीय हस्तेक्षप आणि त्यामुळे ऐनवेळी काही नावांत झालेला बदल यामुळे अस्वस्थ असलेल्या पोलीस दलात पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या बदलीनंतर १४ दिवस होऊनही बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नवे पोस्टिंग न मिळाल्याने त्यात भरच पडली आहे.
पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले तब्बल १५ वरिष्ठ अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून त्यांच्या जागी बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी कार्यभार घेतला; पण हे अधिकारी नामधारीच त्या त्या जिल्ह्यातच ठाण मांडून आहेत. सरकारने काल आणखी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यातील जवळपास १० अधिकारी पुन्हा वेटिंगवर आहेत. त्यामुळे तब्बल २५ हून अधिक अधिकारी यांना मुक्त केले; पण त्यांना नवीन जबाबदारी मिळालेली नाही. बदल्या करताना स्थानिक राजकारण, भाजपशी सलगी केल्याचा संशय आदी बाबींचा ठळकपणे विचार केल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांत आहे.