यंदाच्या 2021आयपीएलमधील हे आहेत कर्णधार; कोण ठरेल यशस्वी कर्णधार ?

Spread the love

आयपीएल २०२१ आता फक्त तीन दिवसांवर आहे. त्यामुळे आठही संघांच्या कर्णधारांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यंदा राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसन आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी रिषभ पंत हे नवे कर्णधार आहे. सर्वांत यशस्वी कर्णधार रोहित शर्मा , त्यानंतर महेंद्रसिंग धोनी , के.एल.राहुल , विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि ओईन मॉर्गन हेसुद्धा आहेत. धोनी सर्वांत अनुभवी तर पंत व सॅमसन कर्णधार म्हणून अगदीच नवखे आहेत. आता यंदा त्यांच्यात कोण आपली निर्णयक्षमता, हुशारी आणि सहकाऱ्यांचा योग्य उपयोग करून यश मिळवतो हे लवकरच समजेल; पण नेतृत्वाचे दडपण आणि अपेक्षांचा दबाव प्रत्येकच झेलू शकतो असे नाही.

रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ सर्वाधिक पाच वेळा ( 2013, 15, 17, 19 आणि 2020) विजेता ठरला आहे. आता विजेतेपदाची हॅट्रिक हे त्यांचे लक्ष्य आहे. स्वतः रोहितचे कर्णधार म्हणून तर आहेच पण फलंदाज म्हणूनही मोठे योगदान आहे. २०१३ पासून मुंबईचे नेतृत्व करताना रोहितने ११६ सामन्यांपैकी ६८ सामन्यांत यश मिळवले आहे तर ४४ सामने गमावले आहेत. चार सामने ‘टाय’सुद्धा झाले आहेत. विजयाची टक्केवारी ६०.३४ अशी आहे. गेल्या स्पर्धेत त्याने १२७ च्या स्ट्राईक रेटने ३३२ धावा केल्या आहेत.

महेंद्रसिंग धोनी, चेन्नई सुपर किंग्ज

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाबद्दल शंकाच नाही; पण गेल्या वर्षी तो स्वतः आणि त्याचा मजबूत संघ फिका पडला होता. ते अपयश पुसून काढायचा यावेळी माहीचा प्रयत्न राहील. सीएसकेच्या चाहत्यांकडून ‘थला’ हा मानाचा किताब मिळवलेल्या धोनीच्या नेतृत्वात सीएसकेचा संघ २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेता ठरला आहे. २०१९ मध्ये ते उपविजेते होते. धोनीने सीएसके व रायझिंग सुपरजायंटस पुणे या दोन्ही संघांचे मिळून १८८ सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्यापैकी ११० जिंकले तर ७७ गमावले आहेत. यशाचे प्रमाण ५८.८२ टक्के आहे. गेल्या वर्षी यूएईमध्ये सीएसकेचा संघ जसा फिका पडला तशी धोनीची बॅटही तळपली नाही. त्याला १४ सामन्यांत फक्त २०० धावा करता आल्या; मात्र आता आयपीएल पुन्हा मायदेशी खेळली जाणार असल्याने धोनीला फॉर्म गवसेल आणि त्याचा संघही पुन्हा यशाच्या मार्गावर येईल अशी आशा आहे.

विराट कोहली, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली कर्णधार म्हणून भरपूर यशस्वी ठरला असला तरी आयपीएलमध्ये याच्या अगदी उलट स्थिती आहे. त्याचा संघ एकदासुद्धा आयपीएल जिंकू शकलेला नाही. २०११ पासून आरसीबीचे नेतृत्व करताना त्याच्या नावावर १२५ सामन्यांत ५५ विजय आहेत. ६३ पराभव आणि ३ टाय सामन्यांसह त्याची यशाची सरासरी ४६.६९ टक्के येते. गेल्या आयपीएलमध्ये तो बऱ्यापैकी यशस्वी ठरला होता आणि त्याने १५ सामन्यांत १२१ च्या स्ट्राईक रेटने ४६६ धावा केल्या होत्या.

डेव्हिड वॉर्नर, सनरायजर्स हैदराबाद

नेहमीच चांगला संघ असूनही यश मिळवू न शकलेला संघ असे एसआरएचचे वर्णन करण्यात येते. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातच त्यांनी एकमेव यश २०१६ मध्ये मिळवले होते. त्या वर्षी त्याने नऊ अर्धशतकांसह ८४८ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही त्याने एसआरएचच्या संघाला क्वालिफायर सामन्यापर्यंत नेले होते. गेल्यावेळी त्याने १३४ च्या स्ट्राईक रेटने ५४८ धावा केल्या. कर्णधार म्हणून आयपीएलमधील त्याची यशाची टक्केवारी ५४.७६ अशी चांगली आहे. ३४ विजय, २८ पराभव आणि एक टाय सामना त्याच्या नावावर आहे. आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधार रोहित शर्माच्या बरोबरीने वॉर्नरचे हे यश आहे; पण विजेतेपद मात्र एकच आहे.

के. एल. राहुल, पंजाब किंग्ज

के. एल. राहुलसाठी कर्णधार म्हणून गेल्या वेळचे आयपीएल हा पहिला अनुभव होता आणि तो संमिश्र यशाचा राहिला. नेतृत्वाच्या जबाबदारीतही राहुलची बॅट मात्र चांगली तळपली. त्याने १४ सामन्यांत ६७० धावा करताना ऑरेंज कॅप जिंकली आणि आयपीएलच्या इतिहासातील १३२ धावांची सर्वोच्च खेळीसुद्धा आपल्या नावावर लावली. त्याच्या संघाने नंतर नंतर ओळीने पाच सामने जिंकून जोरदार मुसंडी मारली होती; पण प्ले ऑफच्या ते बाहेरच राहिले होते. यावेळी नव्या नावासह खेळताना किमान प्ले ऑफचे त्यांचे लक्ष्य आहे. पाच विजय, सात पराभव त्याच्या नावावर आहेत.

ओईन मॉर्गन, कोलकाता नाईट रायडर्स

इंग्लंडच्या या विश्वविजेत्या कर्णधाराकडे गेल्या वर्षी मधेच कर्णधारपदाची सूत्रे आली होती. तो विश्वविजेता कर्णधार असला तरी आयपीएलमध्ये मात्र त्याला यश मिळाले नाही. सात सामन्यांत दोन विजय, चार पराभव आणि एक टाय अशी त्याची कर्णधार म्हणून तर फलंदाज म्हणून ४१८ धावांची कामगिरी राहिली. यंदा सुरुवातीपासूनच तो केकेआरचा कर्णधार राहणार असल्याने यावेळी खऱ्या अर्थाने त्याच्या नेतृत्वाची परीक्षा आहे.

रिषभ पंत, दिल्ली कॅपिटल्स

गेले सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवल्यावर रिषभ पंतच्या खांद्यावर अचानक दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी येऊन पडली आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला ही संधी मिळाली आहे. गेल्या वेळी दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहचला होता. आता ते उपविजेतेपद विजेतेपदात रूपांतरित करायची जबाबदारी २३ वर्षे वयात रिषभच्या खांद्यावर येऊन पडली आहे. तो एवढ्या कमी वयासह आयपीएलच्या इतिहासातील पाचवा सर्वांत तरुण कर्णधार आहे. गेल्या वर्षी त्याने ११४ च्या स्ट्राईक रेटने ३४२ धावा केल्या होत्या; मात्र यावेळी त्याच्याकडून अधिक धावांची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.

संजू सॅमसन, राजस्थान रॉयल्स

सुरुवात चांगली करतो पण नंतर ढेपाळतो अशी ख्याती झालेल्या संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची धुरा आली आहे; कारण त्यांनी स्टिव्ह स्मिथला यंदा रिलीज केलेले आहे. आरआरचा तो राहुल द्रविड व अजिंक्य रहाणेनंतर तिसरा भारतीय कर्णधार आहे. गेल्या वेळी त्याने आरआरसाठी १५८ च्या भरभक्कम स्ट्राईक रेटसह सर्वाधिक ३७५ धावा केल्या होत्या; मात्र राजस्थानचा संघ गेल्या वर्षी तळाला होता. त्यातून संघाला वर उचलण्याची अवघड जबाबदारी आता संजू सॅमसनच्या शिरावर येऊन पडली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.