राष्ट्रवादीमधील निष्ठवंतांच्या नाराजीचा फायदा श्रीमंत कोकाटे यांना होणार का?
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटामधील निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते या दोन्ही फळींमध्ये सध्या नाराजीचा सूर ऐकायला मिळत असून गेल्या काही काळापासून सातत्याने पक्षातील निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या लोकांना दिली जाणारी सन्मानाची पदे हे या नाराजीमागचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील निष्ठावंतांच्या नाराजीचा फायदा अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांना होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
गतवर्षीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतील अनेक नेते पक्षाची साथ सोडून भाजपमध्ये जात होते, तेव्हा पक्षातील निष्ठावंत नेते आणि कार्यकर्त्यांच्या बळावर राष्ट्रवादीने संपूर्ण चित्रच पालटून टाकले होते. महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पक्षामध्येही नवचैतन्य निर्माण झाले. त्यानंतर पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या लोकांचा सन्मान होणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले काही पहायला मिळाले नाही.
सुरुवातीला यावर्षी मे महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रवक्ते म्हणून राज्यभर ओळखले जाणाऱ्या अमोल मिटकरी यांना आमदारकी बहाल करण्यात आली. कधीकाळी हेच मिटकरी शरद पवार साहेबांच्या बोलण्याच्या पद्धतीवरुन त्यांची टिंगलटवाळी करण्यात अग्रेसर होते. बाहेरुन आलेल्या मिटकरींना अल्पावधीतच मिळालेल्या आमदारकीमुळेही पक्षात काम करणारे अनेक निष्ठावंत पदाधिकारी, लोक नाराज झाले होते.
नुकतेच विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांबाबत पुन्हा तेच चित्र बघायला मिळाले. राष्ट्रवादीच्या कोट्यातील चार जागांसाठी पक्षाकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे या चार नावांची शिफारस करण्यात आली आहे. परंतु या चारही नावांचा पूर्वेतिहास हा राष्ट्रवादी आणि शरद पवार विरोधक असाच राहिला आहे.
एकनाथ खडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपचे ४० वर्षांपासूनचे प्रमुख नेते आहेत. नुकतेच भाजपमधून ते राष्ट्रवादीत आले. याच एकनाथ खडसेंनी एकेकाळी ‘शत प्रतिशत भाजपा’ असा नारा देत महाराष्ट्रातून राष्ट्रवादी हद्दपार करण्याची भूमिका घेतली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही मागच्या दहा वर्षांच्या कालखंडात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसदर आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नावरून खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची प्रतिमा आणि विश्वासार्हता या दोन्हीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. उसदरासाठी शेट्टींनी बारामतीत केलेल्या आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता.
यशपाल भिंगे हे देखील पूर्वाश्रमीचे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत. मागच्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीनेदेखील महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर गंभीर टीका आणि आरोप करुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. वंचित बहुजन आघाडीमुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पडले होते हे जगजाहीर आहे.
आनंद शिंदे हे देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निष्ठा ठेऊन पूर्णवेळ भाजपचेच काम करत असल्याचे त्यांच्या व्हायरल झालेल्या पत्रावरून दिसून येते.
आताही पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये पक्षासाठी निष्ठावानपणे काम करणाऱ्या लोकांना संधी मिळणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. पदवीधरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ज्यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे, त्या अरुण लाड यांनी मागच्या वेळी बंडखोरी केल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील यांचा पराभव होऊन भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर चंद्रकांत पाटलांचा राजकीय उदय हा अरुण लाडांच्या बंडखोरीतून झाला आहे.
चंद्रकांत पाटलांनी तेव्हाच्या पदवीधर आमदारकीच्या बळावरच राज्यात मंत्रिपद आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद मिळवले. आता तेच चंद्रकांत पाटील पवारांच्या बारामतीत येऊन पवारांना आव्हान देण्याची भाषा बोलत आहेत. पवारांची अभ्यास नसणारे छोटे नेते म्हणून हेटाळणी करत आहेत. त्यांना कमी लेखून जाणीवपूर्वक मराठा समाजात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्याचे काम करत आहेत.
मागच्या वेळी बंडखोरी करुन राष्ट्रवादीचा उमेदवार पाडणाऱ्या अरुण लाड यांनाच यावेळी राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने पक्षाच्या निष्ठावंत लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. विरोधकांचा सन्मान आणि निष्ठावंतांचा अपमान अशी काहीशी राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे अशी नेते आणि कार्यकर्ते खाजगीत चर्चा करताना पाहायला मिळत आहे.
ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना माडखोलकरांच्या “हे राज्य मराठा की मराठी ?” या एका प्रश्नामुळे यशवंतराव दबावाखाली आले तिथून पुढे काँग्रेसही कायम दबावाखाली राहिली. तीच गोष्ट आता राष्ट्रवादीच्या बाबतीत होताना पाहायला मिळत आहे. शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मराठा असा शिक्का मारल्यानेच ते जाणीवपूर्वक नेहमी ओबीसी गटाला खुश करणारी भूमिका घेतात असा एक आक्षेप नोंदवला जातो. यामुळे मराठा समाज दुखावला आहे. दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाजात प्रचंड नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंतांमधील आणि मराठा समाजातील या सर्व नाराजीचा फायदा शरद पवारांवर श्रद्धा असणारे उमेदवार श्रीमंत कोकाटे यांना होण्याची शक्यता आहे असे राजकीय वर्तुळातील अनेक विश्लेषकांनी सांगितले आहे. स्वतः श्रीमंत कोकाटे यांनाही शरद पवार आपल्यालाच मदत करतील असा विश्वास आहे.