कोरोना विषाणूची दुसरी लाट 100 दिवस टिकणार; तज्ज्ञांचा दावा!
भारतात सध्या कोरोना विषाणूचं संक्रमण वेगाने होत आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात दररोज 2 लाखाहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद होतं आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट केव्हा ओसरणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांच्या एका तज्ज्ञाने तयार केलेल्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूची दुसरी लाट अजून 100 दिवस कायम राहू शकते. शिवाय देशातील 70 टक्के लोकांच लसीकरण पूर्ण होईपर्यंत किंवा लोकांच्या रोगप्रतिकार शक्तीचा स्तर उंचावण्यापर्यंत (हर्ड इम्युनिटी) अशा प्रकारच्या कोरोना विषाणूच्या लाटा येतचं राहतील, असा अंदाजही संबंधित तज्ज्ञाने वर्तवला आहे.
हर्ड इम्युनिटीमुळे लोकांना संसर्गजन्य रोगांपासून अप्रत्यक्ष संरक्षण मिळतं. लसीकरणानंतर किंवा संसर्गानंतर बरं झाल्यानंतर लोकांची प्रतिकारक शक्ती विकसित होते. लोकांच्या सामूहिक रोग प्रतिकारक शक्तीला हर्ड इम्यूनिटी म्हणतात. डॉ. नीरज कौशिक यांनी पुढे सांगितलं की, कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमध्ये लोकांची प्रतिकारक शक्ती कमी करण्यासोबतच लशीचा प्रभाव कमी करण्याची क्षमता देखील या विषाणूत आहे.
कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक संक्रामक आहे. त्यामुळे ज्या लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. अशा लोकांनाही कोरोना विषाणूचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. डॉ. कौशिक यांच्या मते, म्युटेटेड कोरोना विषाणू इतका संसर्गजन्य आहे, की तो जर घरातील एका व्यक्तीला झाला तर संपूर्ण कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात सापडू शकतो. हा विषाणू लहान मुलांसाठी देखील घातक आहे. शिवाय हा विषाणू आरटी-पीसीआर सारख्या चाचण्यांमध्ये देखील सापडत नाहीये. तथापि, वास न येणं कोरोना विषाणूची लागण झाल्याचं एक मोठा संकेत आहे.
मास्क वापरणं अत्यंत महत्त्वाचं..
कोरोना विषाणूची दुसरी लाट 100 दिवसांपर्यंत टिकू शकते. शिवाय जोपर्यंत 70 टक्के लोकांच लसीकरण होतं नाही आणि हर्ड इम्युनिटी वाढत नाही, तोपर्यंत अशा लाटा येतच राहतील. त्यामुळे मास्क वापरणे हा एकच पर्याय तूर्तास उपलब्ध आहे.