डॉ प्रकाश कोयाडे (YCM Hospital) यांच्या अनुभवातून कोरोना काय आहे; जरूर वाचा!
पुणे | गेल्या पंधरा वीस दिवसांपासून ‘कोरोना एक षडयंत्र’ किंवा ‘कोरोना अस्तित्वातच नाही’ अशाप्रकारच्या मथळ्याखाली सोशल मीडियावर लेख येत आहेत. काही लोकांनी… त्यात स्वत:ला डॉक्टर म्हणवणारेही आहेत, विडीओ बनवून कोरोना एक भीतीचा धंदा असून कोरोनाच्या नावाखाली पैशाची कशी लुटमार होते आहे याबद्दल विडीओ व्हायरल केले. काही ओडिओ क्लिपही व्हायरल होत आहेत ज्यामध्ये कुठल्यातरी क्वारंटाईन सेंटरमध्ये कशाप्रकारे प्रतिरुग्ण लाखो पैसे हॉस्पिटलला मिळतात आणि एकासोबत पुर्ण घरच्यांना काही कारण नसताना पैश्यासाठी कसे क्वारंटाईन करतात वगैरे चर्चा केलेली आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून कितीतरी डॉक्टर तसेच जागरूक नागरिक गैरसमज दूर करण्याऱ्या पोस्ट तळमळीने लिहीत आहेत पण सत्य चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं तसाच काहीसा प्रकार झाला आहे. अशावेळी सत्य सांगण्यासाठी एखादं उदाहरण देण्याची गरज पडते…
खाली दोन एक्स-रे दिले आहेत. पहिल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा गडद शेड दोन्ही बाजूला दिसतोय. हा नॉर्मल एक्स-रे आहे जो तुमचा माझा असेल. याचा अर्थ रुग्णाचे किंवा त्या व्यक्तीचे फुफ्फुस एकदम चांगल्या स्थितीत आहे. याउलट दुसरा फोटो… खरंतर हा दुसरा एक्स-रे कोणी डॉक्टरांनी पाहिला तर त्यांच्या भुवया उंचावतील एवढा हा खराब आहे. या अवस्थेला पोचलेले फुफ्फुस आणि तो रुग्ण बरा होणे अशक्यच… मृत्यू हाच पर्याय उरतो! कोरोना व्हायरस काय करू शकतो याचे हे उदाहरण! रुग्णाच्या फुफ्फुसाला अशाप्रकारे संपवून टाकतो.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4161527953888413&id=100000937470888
कोणाला घाबरवणे किंवा भीती निर्माण करणे हा माझा उद्देश निश्चितच नाही पण ‘कोरोना नाहीच’ म्हणणाऱ्यांसाठी हे उदाहरण आहे. अज्ञानात सुख असते पण जाणूनबुजून पसरवलेल्या अज्ञानामुळे गाफीलपणा येईल आणि ज्यांची काही चूक नाही त्यांचा हकनाक बळी जाईल. फोटोमध्ये दाखवलेला दुसरा एक्स-रे हा काही कोणा वृद्ध व्यक्तीचा नाही तर पस्तीस वर्षाच्या तरुणाचा आहे ज्याचा काल रात्री मृत्यू झाला. प्रत्येकाचाच एक्स-रे एवढा वाईट नसतो, ही खूप दुर्मिळ केस होती पण कोरोना व्हायरस एवढा भयंकर परिणाम करू शकतो हेही लक्षात घेतले पाहिजे.
कोरोनामुळे आजवर किती डॉक्टर मृत्यू पावले याचा अंदाज तरी आहे का आपल्याला? आजही कित्येक डॉक्टर आयसीयु मध्ये भरती आहेत. काल उदगीर येथील आमचे सहकारी, एक बालरोगतज्ञ मृत पावले… सांगण्याचा उद्देश हाच की, ‘कोरोना हा एक आजार आहे आणि त्यामुळे जीवाला धोका पोचू शकतो.’ गेल्या चार-पाच महिन्यांत एवढं मोठं महाभारत घडलं तरी वरील ओळ पुन्हा पुन्हा सांगावी लागते यापेक्षा वाईट काय असू शकते. कोरोना एक षडयंत्र आहे, टेस्ट करू नका, काढा प्या, दवाखान्यात जायची गरज नाही… असल्या व्हाट्सअप मेसेजेसला मनावर घेऊ नका! या गाफीलपणामुळेच आजवर चूक नसलेले लोक बळी पडत आहेत याचं वाईट वाटतं. भारताचा मृत्यूदर अतिशय कमी असला तरी एकेका व्यक्तीच्या जिवाची खूप मोठी किंमत मोजावी लागते. कारण नसताना अॅडमिट करून घ्यायला डॉक्टर वेडे नाहीत… आयसीयु मध्ये तर सोडाच पण जनरल वार्डमध्ये लोक मरत आहेत कारण जागाच शिल्लक नाही. प्रत्येकालाच या आपत्तीमधून शक्य होईल तेवढं लवकर बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत सर्वसामान्य लोक साथ देणार नाहीत तोपर्यंत हा वेळ वाढतच जाईल.
हा एक्स-रे ज्या तरुण व्यक्तीचा होता त्यांच्या पत्नीकडून सर्व हिस्टरी, माहिती घेतली तेंव्हा समजले की त्यांना कोणताही आजार नव्हता, बाऊन्सर म्हणून काम करायचे म्हणे ते. पाच दिवसांपासूनच श्र्वसनाचा अतिशय त्रास होऊ लागला. चार दिवस घरीच वाफ घेणे वगैरे उपचार करून मनाचे समाधान करून घेत राहिले आणि शेवटच्या क्षणी दवाखान्याचा रस्ता धरला. हा बॉडी बिल्डर माणूस जाण्यासारखा नव्हता पण केवळ दुर्लक्षपणामुळे गेला… यापाठीमागे जर पसरलेली चुकीची माहिती आणि चुकीचे व्हाट्सअप ज्ञान असेल तर यापेक्षा मोठं कोणतं दुर्दैव नसेल. योग्य वेळीच जर उपचार सुरू झाले असते तर एक कुटुंब उध्वस्त होण्यापासून शंभर टक्के वाचले असते!
काळजी घ्या!
डॉ प्रकाश कोयाडे
(YCM Hospital Pune)