राज्यातील साहित्यीकांना कोरोनाची मोफत लस तात्काळ देण्याची अखिल भारतीय मराठी साहित्य परीषदेची मागणी!
उस्मानाबाद : नाशिक येथे होऊ घातलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास राज्य शासनाने निधी देण्याऐवजी राज्यातील साहित्यीकांना कोरोनाची मोफत लस तात्काळ देण्याची मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य परीषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे व त्यांच्या पदाधिकारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. या मागणीमुळे पुन्हा एकदा नाशिकचे साहित्य संमेलन चर्चेत आले आहे.
या निवेदनात महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढलेले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या साहित्यिकांना पैशाअभावी लस घेणे शक्य होणार नाही तरी महाराष्ट्रातील चाळीस ते पन्नास हजार साहित्यिकांना मोफत लस उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा कार्याध्यक्ष परमेश्वर पालकर, मुंबई अध्यक्षा राजश्री बोहरा, कोकण अध्यक्ष डॉ अ ना रसनकुटे, विदर्भ अध्यक्ष आनंदकुमार शेंडे, लातूर विभागीय कार्याध्यक्ष बालाजी सुरवसे, महाराष्ट्र अध्यक्ष फुलचंद नागटिळक, पुणे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, पत्रकार ओंकार कुलकर्णी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निधी संकलनास सुरवात – शरद गोरे
महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांना मोफत लस मिळावी यासाठी आमच्या साहित्य परिषदेच्या वतीने राज्यभरातून निधी संकलनास सुरवात केली असुन विभागवार बैठका सुरु आहेत. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी या सत्कार्यासाठी पुढे यावे असे आवाहन साहित्यिक शरद गोरे यांनी केले आहे.