कोरोना..‌आणि महाराष्ट्राचा ग्रामीण भाग?

Spread the love

डॉ. प्रकाश कोयाडे

(कोरोना ICU मेडिकल अॉफिसर, YCM Hospital Pune)

ही पोस्ट वाचण्याआधी प्रत्येकाने स्वत:ला एकदा विचारून पहावे की, माझ्या संपर्कातील, कुटुंबातील किती लोक आजवर कोरोना पॉझिटिव्ह आले आणि किती मृत्यू झाले? इतर कोणत्याही मार्गाने या प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगण्याचा मार्ग आता उरलेला नाही! महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने या घडीला सतर्क होणे अत्यंत आवश्यक आहे. आपण कोरोनाच्या बाबतीत एका अशा मध्यावर उभा आहोत जिथे हा व्हायरस मोठ्या शहरातून ग्रामीण भागाकडे पसरतोय. हा आजार अजूनही ना पुर्णपणे महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांतून संपला आहे ना पुर्णपणे छोटी शहरे आणि ग्रामीण भागात पसरला आहे… पण आपण या दोन्हीच्याही वाटेवर आहोत! येणारे पुढचे तीन महिने ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

सध्याची आकडेवारी पाहिली तर एक गोष्ट स्पष्टपणे समोर येत आहे की, भारतात पंधरा अॉगस्ट पासून अॅक्टिव रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. जुलैच्या मध्यापासुन अॉगस्टच्या मध्यापर्यंत कमी कमी होत असलेली रुग्ण संख्या गेल्या पंधरवड्यात झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात ही वाढत असलेली संख्या प्रामुख्याने ग्रामीण भागातील आहे. लवकर रिझल्ट देणारी अॅंटीजन टेस्ट हेसुद्धा एक रुग्णवाढीचा आकडा दर्शविणारे महत्त्वाचे कारण आहे. एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या… आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण किती पेशंट झाले या गोष्टीला काहीही अर्थ नाही किंवा दरदिवशी किती नवीन रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत यालाही काही अर्थ राहिलेला नाही… पण सध्या असलेल्या अॅक्टिव रुग्णांपैकी किती रुग्णांना इतर गंभीर आजार आहेत, त्यांपैकी किती रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अॅडमिट (पॉझिटिव्ह पेशंटला क्वारंटाईन करणं वेगळं आणि उपचारासाठी अॅडमिट करणं वेगळं) करण्याची गरज आहे आणि त्यांपैकी किती रुग्णांना बेड मिळतोय हा आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे.

गेल्या काही महिन्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील कोरोना बाधीत भागातील रुग्णसंख्या भरपूर कमी झाली आहे, इम्युनिटी तयार होत आहे पण आपली लोकसंख्या अफाट असल्याने हा फरक जास्त प्रमाणात जाणवत नाही. एक टक्के रुग्ण बाधीत असले तरी हॉस्पिटल भरुन जातात. त्यामानाने ग्रामीण भागामधील संसर्ग कितीतरी पटीने वाढत आहे. अॉगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापुर जिल्ह्यात पाच हजार रुग्ण होते आज फक्त एका महिन्यात तिथे तेवीस हजार रुग्ण झाले आहेत… चार पटीहून अधिक! बीड जिल्ह्यात हाच आकडा फक्त एका महिन्यात एक हजाराहून पाच हजारांवर गेला आहे. अहमदनगरमध्ये चार पट वाढ झाली आहे. लातूरमध्ये काल एका दिवसात दीड हजार नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत… जवळपास प्रत्येक जिल्ह्याची कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात यांना उपचार मिळणे ही प्राथमिक गरज आहे. रुग्ण बरे होण्याचा दर भरपूर चांगला असला तरी हा वाढता आकडा कुठेतरी चिंताजनक आहे… अंगावर येणारा आहे!

धारावी, मालेगाव, मुंबईतील इतर जास्त बाधीत प्रदेश, पुणे नागपूरातील गर्दीच्या वस्त्यांमधून हे प्रमाण कमी होण्यासाठी किमान तीन महिने पुर्ण ताकदीने प्रयत्न केले गेले, पुण्यात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात ५१ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अॅंटीबॉडी मिळाल्या आहेत… पण यासाठी पुणेकरांना तीन ते चार महिने लागले आहेत! महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात होत असलेली वाढ पाहता पुढील किमान दोन ते तीन महिन्यांतील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सर्व बाजूंनी सज्ज आहे का? मार्च महिन्यापासून ही साथ आपल्या अवतीभवती फिरत आहे. यादरम्यान राज्यातील साधारणपणे मोठ्या शहरांकडेच व्यवस्थेचे प्रामुख्याने लक्ष होते. खरंतर ग्रामीण भागाकडे लक्ष देण्यासाठी, पुर्वतयारीसाठी आपल्या हातात पाच महिने होते… यादरम्यान त्या पातळीवर आपली व्यवस्था उभी राहिली आहे का हाच एक मोठा प्रश्न आहे. केवळ क्वारंटाईन सेंटर उभे करणे हाच एकमेव उपाय असू शकत नाही, उपचारासाठी सुविधा उपलब्ध असणे हे महत्त्वाचे आहे. अमरावती, वर्धा, लातूर, नांदेड, धुळे, सांगली यांसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहेत, तज्ञ डॉक्टर आहेत… तिथे सोय होईल ती फक्त त्या शहरापुरत्या लोकांची. जिथे मेडिकल कॉलेज नाही तिथे कोणती व्यवस्था असणार आहे… आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तालुका पातळीवर काय तयारी आहे? पुढच्या तीन महिन्यांत ग्रामीण भागात उद्भवणारी अख्ख्या जिल्ह्याची परिस्थिती पेलण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल अपुरे पडेल तेव्हा तालुका पातळीवरील सरकारी दवाखान्यात बेड आणि व्हेंटिलेटरची तयारी आजच करणं, खाजगी दवाखान्यांची मदत घेणं आवश्यक आहे.

ही काही कोरोनाची दुसरी लाट नाही… लाट पहिलीच आहे, फक्त हा आजार जागा बदलतोय! ग्रामीण भागातील लोकांची इम्युनिटी शहरी भागापेक्षा जास्त असते कारण त्यांचा मातीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असतो. खानपानाच्या राहणीमानाच्या सवयी वेगळ्या असतात पण म्हणून धोका टळत नाही. अज्ञान, अपुरी माहिती, जनजागृतीचा अभाव, आर्थिक टंचाई या गोष्टींचा खूप फरक पडतो. हळूहळू करू किंवा वेळ पडली तरच करू या इंडियन अॅटिट्युडला दूर सारून सर्वांनी काम करणं आवश्यक आहे. लोकांना घाबरवण्यात, उगीच भिती निर्माण करण्यात काही अर्थ नाही पण देशभरात वाढती अॅक्टिव रुग्णसंख्या आणि दरदिवशी कोरोनामुळे हजाराहून अधिक होणारे मृत्यू ही कोणत्याच बाजूने चांगली गोष्ट नाही. आपापली कामे करत स्वत:ला आणि आपल्या स्वकीयांना जपायचं आहे. एकवेळ पैशाचंही सोंग घेता येईल पण निरोगी असल्याचं सोंग घेताच येत नाही… कोणी कितीही ‘कोरोना नसल्याची’ किंवा ‘हे सर्व थोतांड असल्याची’ झापडं डोळ्यावर ओढून असेल पण नाकावरचा मास्क अजूनही गेलेला नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. शहरी भागातील साथ कमी होत आहे म्हणून त्यांनीही दुर्लक्ष करू नये आणि अजून आपल्या घरात आला नाही म्हणून ग्रामीण भागात कोणी निर्धास्त राहू नये. पुणे-मुंबईत हजारोंनी दवाखाने असताना कित्येक रुग्णांना बेड मिळाले नाहीत, अजूनही मिळत नाहीत… मग ग्रामीण भागातील परिस्थिती कशी असेल हे वेगळं सांगायला नको. मृत्यूदर फक्त दोन टक्के आहे… पण या दोन टक्क्यातील एकेक व्यक्ती खूप महत्त्वाचा आहे! अवेळी गेलेल्या एका जिवाची किंमत काय असते ते फक्त त्याच्या नातेवाईकांनाच माहीत असते… मग कशाला हे संकट ओढवून घ्यायचं?

शासन, प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जनता या सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे तरच ही साथ लवकर आटोक्यात येईल! तहान लागल्यावर विहीर खोदायला सुरू करण्यात काहीही अर्थ नाही… त्याने अजून घसा कोरडा पडतो, वेळीच भानावर येणं आवश्यक आहे!

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.