Breaking: भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात आरोग्य विभागाकडून अखेर मोठी कारवाई; सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन!

Spread the love

मुंबई | संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयात लागेलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकारानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेला जबाबदार ठरवत तिथले डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करण्यात आली आहे. सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा 9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बालकांना वाचवण्यात यश आलं होतं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं आहे.

7 जणांवर कारवाई, 6 जणांचं निलंबन
आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेसंबंधीचा अहवाल काल उशिरा आरोग्य विभागाला मिळाला. त्या अहवालानुसार रेडियंट हिटरमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागली होती. रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ही आग लागली. रुम बंद आणि तिथं प्लास्टिक असल्यानं आग पसरली. 2015 मध्ये या रुग्णालयाचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळी रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नाही. आगीमागे ते कारणही आहे. तसंच तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सनी कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. या प्रकरणात सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुशील अबाते यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. नर्स ज्योती भास्कर, स्टाफ नर्स स्मिता आंबीददुलके आणि शुभांगी साठवणे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.