…आणि अखेर शेवटी भेट घडलीच; अनपेक्षित अन् अविस्मरणीय!

Spread the love

पिंपरी चिंचवड | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सेवाभावी वृत्तीने साऱ्या महाराष्ट्राचे मन जिंकणारे आमदार निलेश लंके यांच्याशी माझे १३ मे २०२१ रोजी फोन वर बोलणे झाले होते. यावेळी हा माणूस किती दिलदार आहे, याची मला प्रचिती आली. आमचे यावेळी जे संभाषण झाले त्याचा सोशल मीडियावर कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला होता. या कॉल रेकॉर्डमध्ये लंके साहेब मला बोलले होते की, कधीही भेटायला ये पारनेरला…

कोविड काळात लंके साहेबांनी जे कार्य केले आहे ते संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी पाहिले आहे. हा लोकनेता किती साधा आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याबद्दल मी काय बोलणार आणि सांगणार. लंके साहेबांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना World Book Of Records, London या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. अशा लोकनेत्याला भेटायची मनापासून इच्छा होतीच पण ती कधी पूर्ण होईल माहीत नव्हते.

सध्या मी नोकरीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमधील भोसरी या ठिकाणी स्थायिक आहे. मला असेच सोशल मीडियाच्या माध्यमातून समजलं की लंके साहेब ०७ जुलै २०२१ रोजी पिंपरी चिंचवडमधील जाधववाडीमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहेत. कामाच्या गडबडीत हे मी विसरून गेलो होतो पण माझा मित्र विनय पाटील यांनी कॉल करून आठवण करून दिली. मी लगेच लंके साहेबांना कॉल केला. साहेब बोलले की, “बोल रोहित.. काय म्हणतोस.. कुठे आहेस? मी सांगितले की मी भोसरीत आहे. तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही आज कार्यक्रमासाठी येणार आहात ना..? साहेब म्हणाले की नक्की भेटू. मी पोहचत आहे थोड्या वेळात कार्यक्रमाच्या ठिकाणी ये, भेटू तिथंच.. आणि फोन ठेवला.

मी लगेच भोसरीमधून जाधववाडीकडे कार्यक्रमाला निघालो पण साहेबांना काहीतरी दिले पाहिजे, असा विचार करत असताना मला अचानक आठवलं की आपण नेहमी अशा भेटी दरम्यान कोणतेही पुस्तक भेट स्वरूपात देत आलो आहे. आता पण पुस्तकच देऊ या. पण नेमके माझ्याकडे पुस्तक नव्हतं. मग मला आठवल की माझा मित्र विशाल सावंत हा इंद्रायणीनगरमध्ये राहतो. त्याच्याकडे मला पुस्तक नक्की मिळेल, या विश्वासाने मी कॉल केला. विशाल बोलला की ये घरी आणि घेऊन जा पुस्तक. मी ‘मऱ्हाठा पातशहा’ हे केतन पुरी लिखित पुस्तक त्याच्याकडून घेतले आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचलो.

लंके साहेबांची लोकप्रियता पाहता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. साहेबांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. मला वाटलं या गर्दीत आपली भेट होणार नाही. कार्यक्रम चालू झाला साहेबांचा सन्मान झाला. साहेबांचे भाषण ऐकलं. वाटलं साहेबांशी नक्की भेट होईल. कार्यक्रम संपला. साहेब निघाले. गर्दीतून वाट काढत मी साहेबांपाशी पोहचलो. आणि बोललो साहेब, मी रोहित. कॉल केला होता. ते बोलले की मागच्या गाडीत बसा आणि चला सोबत. मला काही कळालेच नाही, कुठे जायचे? मी गाडीत बसलो. साहेबांचे कार्यकर्ते म्हणाले, आमच्या पारनेरचे एक कुटूंब इथे राहते. त्यांच्या घरी चहासाठी जायचे आहे. गप्पा मारत मारत आम्ही त्या कुटूंबाच्या घरी पोहोचलो. साहेबांनी मला त्यांच्या बाजूला खुर्चीवर बसायला बोलावले आणि माझी विचारपूस केली. खूप छान वाटलं.

लोक साहेबांना भेटायला येत होते. त्यांना साहेब भेटत होत पण सगळेजण बुके घेऊन आले होते. मी पण माझ्या बॅगेतून पुस्तक काढले आणि साहेबांना दिले. साहेबांनी पुस्तकाचे नाव वाचले आणि मला विचारलं, तू वाचले आहे का हे पुस्तक? अजून नाही पण वाचणार आहे. मी म्हणालो. लेखक कोण असं त्यांनी विचारलं. मी सांगितलं की माझा मित्र आहे केतन पुरी त्यांनी लिहिले आहे. एवढे बोलून साहेब पुढच्या प्रवासाला निघून गेले. पण कालची ही माझी आणि साहेबांची पहिली भेट अशी धावपळीची आणि अविस्मरणीय झाली..!

शेवटी एकच लंके साहेबांच्या बद्दल सांगावे वाटते की, माणूस खूप साधा सुधा आणि जीव लावणारा आहे… असा लोकनेता असेल तर लोकांना कोणत्याच संकटाची भीती वाटणार नाही.

🖋️ रोहित वनिता शांताराम जाधव, सातारा.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.