खा. अमोल कोल्हे यांच्या ‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद!
पुणे | जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव व खेड या तीन तालुक्यात आदिवासी क्षेत्रात विशेषतः भिमाशंकर अभयारण्यात अनेक दुर्मिळ व औषधी वनस्पती आहेत. या वनौषधींचे जतन करण्याबरोबरच लागवड आणि संशोधन करण्यासाठी बराच वाव आहे. त्यामुळे लोकसभेत प्रवेश केल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात भिमाशंकर अभयारण्यालगत ‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याची मागणी केली होती. तसेच लॉकडाऊन काळात दि. १९ मे रोजी या संदर्भात आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना रीतसर पत्र पाठवले होते.
डॉ. कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक यांनी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB) यांच्या रिजनल कम फॅसिलिटेशन केंद्र (RCFC), मध्य विभाग यांना राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा सविस्तर प्रस्ताव तयार करून राज्य वन संशोधन संस्था (SFRC), पोलीपठार, जबलपूर, मध्यप्रदेश यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक यांनी डॉ. कोल्हे यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रा’च्या मागणीबाबत केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले असून पुढील काळात आपण या ‘राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रा’च्या उभारणीसाठीचा सविस्तर प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले आहे.