कागदम्बा देवीची वैशाखी पौर्णिमेपाठोपाठ नवरात्रीची यात्राही रद्द!

Spread the love

 

उस्मानाबाद (राहुल शेळके) : उस्मानाबाद जिल्ह्य़ातील वाशी तालुक्यातील पारा येथील कागासुर मर्दिनी कागदंबा देवीचा नवरात्र उत्सव हा कोरोना संकटामुळे साध्या पद्धतींने साजरा करण्यात येणार असून नवरात्र पौर्णिमेला असलेली यात्रा देखील रद्द करण्यात आली आहे.

पारा हे गाव बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. तर गावाच्या पूर्वेला 3 किमी अंतरावर साधारणतः 400 वर्षापूर्वीचे स्थापत्य कलेचा अदभूत नमुना असलेले हेमांडपंथी दगडाचे कागदंबा देवीचे मंदिर आहे. हे मंदिर पाऱ्याच्या आईचे मंदिर म्हणून देखील परिसरात परिचित आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिर हे केवळ सहा दगडी खांबावर उभारलेले आहे. या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर बांधकामासाठी वापरण्यात आलेले सर्व दगड हे एकाच आकाराचे आहेत मात्र मंदिर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एक 4 इंचाचा छोटा दगड लावण्यात आला आहे जो की सहजासहजी निदर्शनास येत नाही. या दगडबद्दल ही एक अख्यायिका आहे. त्यानुसार मांजरा नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बीड जिल्ह्यातील नांदूरघाट येथून आजतागायत उस्मानाबाद जिल्हयातील अनेक गावासाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या बार्शी या ठिकाणी व्यापारी, शेतकरी आपला शेतीमाल याच मार्गाने घेऊन जात होते. हा भाग म्हणजे नदीकाठचा घनदाट जंगलाचा असल्याने या ठिकाणी लुटमरीच्या घटना होत होत्या. त्या रोखण्यासाठी वाटसरूंची ओळख पटविण्यासाठी या मंदिराला वापरण्यात आलेल्या या लहान दगडाची खूण विचारली जाऊन राहिवासाबद्दल ओळख पटविण्यात येत होती.

हा झाला मंदिराचा इतिहास परन्तु या ठिकाणी हे मंदिर उभारण्याच्या मागे देखील एक आख्यायिका आहे. त्यानुसार हा भाग दंडकारण्य चा होता. व या ठिकाणी दैत्याचा वावर आल्यामुळे कागासुर नावाचा एक दैत्य लोकांना खूप त्रास देत असे, या त्रासामुळे येथील लोकांनी देवीची उपासना करून यातून मुक्ती मागितली होती. भक्तांच्या या हाकेला धावत अष्टभुजा रूप घेऊन देवीने या ठिकाणी असलेल्या कागासुराचा वध केला व त्यावरून देवीचे कागदंबा हे नाव पडले आहे. नवरात्र काळामध्ये विशिष्ट तीन दिवस उगवत्या सूर्याची किरणे थेट देवीच्या चरणावर पडतात.या काळमध्येच पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा ही भरते. यासाठी जालना,करमाळा,बीड,औरंगाबाद यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भक्त येतात.यामध्ये अनेक नवसपूर्ती झालेले मुस्लिम समाजातील भक्त देखील असतात.देवीची महिमा मोठी असल्याने व अनेक कुटूंबाची कुलदैवत आहे.यामुळे परजिल्ह्यातील नागरिकबरोबर तालुक्यातील नव वधुवर याठिकाणी दर्शनासाठी येतात. वर्षातून नवरात्र पौर्णिमेसह वैशाखी पौर्णिमेला अशा दोनवेळा यात्रा भरत असते. परन्तु या कोरोना संकटामुळे देऊळ बंद असल्याने या सर्व रीवाजवर बंद ठेवण्याची वेळ आली आहे.त्याच बरोबर यावेळी यात्रा रद्द असल्यामुळे पानसे कुटुंबाच्या वाड्यातून हिंगे परिवार पालखी नेण्याची परंपरा राखण्यासाठी प्रशासन परवानगी देतंय की नाही या बाबत ही साशंकता आहे.तर पालखी निघण्यापूर्वी देवीचे माहेर असलेल्या डोंगरेवाडी येथून चोळी व पातळ आणण्याची परंपरा खंडीत होऊ शकते. त्याच बरोबर मंदिरामध्ये प्रवेशबंदी असल्यामुळे 7 व्या माळेला माहेर असलेल्या डोंगरेवाडी येथील आराध्याची गाणी होणार की नाही आणि नाही झाली तर त्यांची गाणी झाल्याशिवाय इतर आराधी मंडळाची गाणी देखील होणार नाहीत. सध्या तर घट स्थापनेपासून होणारी देवीची काकडा आरती,दुपारची नैवेद्य आरती,संध्याकाळची पंचोपचार आरती एकट्या पुजाऱ्यामार्फत भाविकाविना होणार आहे.

देवीची सेवा करणारी आमच्या कुटुंबाची ही अकरावी पिढी आहे. मागील कित्येक शतकात असलेली परंपरा,रीतिरिवाज या कोरोना संकटामुळे बंद ठेवण्याची व भाविकाविना मोजक्या गोष्टी करून उत्सव साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते.असलेल्या नित्याच्या पूजा आरती होतील परन्तु भाविकाविना यामुळे पूजेदरम्यान देवीला हे समस्त मानव जातीवर आलेले हे संकट लवकरात लवकर दूर करण्याची प्रार्थना करणार आहे जेणेकरून भाविकांच्या उपस्थिती त उत्सव साजरा करता येईल.

मंदिरामध्ये असलेल्या मूर्ती पायाखाली कागासुर व अष्टभुजा आहे.अशी या ठिकाणचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरात असलेला जिवंतजलसाठा 1972 च्या दुष्काळातही आटला नसल्याचे गावकरी व पुजारी सांगतात. मंदिर निर्मितीपासून प्रवेशद्वाराच्या समोर एक पाण्याचे कल्लुळ आहे जे की दुष्काळात ही आटले नाही व त्यातून आसपासच्या गावातील लोकांची पाण्याची सोय झाली. आता या ठिकाणी बोअरवेल देखील असून त्यावर असलेल्या हातपंपाचे पाणी दुष्काळी परिस्थितीत ही कमी होत नाही. येणाऱ्या भक्तांची पाण्याची सोय होते.

 

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.