बारामतीकरांच्या विश्वासाला जागणारा नेता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीकरांना अनोखी भेट!

Spread the love

बारामती |  येथील कण्हेरी नजीक साकारणाऱ्या भव्य वनउद्यान प्रकल्पाचे कामकाज येत्या वर्षभरात पूर्ण करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिल्या. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, मुख्याधिकारी किरणराज यादव आदी या प्रसंगी उपस्थित होते.

शहराच्या सौंदर्यात भर पडावी व बारामतीत एक छानसा पिकनिक स्पॉट विकसित व्हावा, निसर्गाच्या सान्निध्यात बारामतीकरांना काही क्षण व्यतीत करता यावेत, या उद्देशाने बारामतीत वन उद्यान विकसित केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून कण्हेरी नजीक वनविभागाच्या 103 हेक्‍टर जागेमध्ये हे नितांत सुंदर वनउद्यान आकारास येणार आहे. या संदर्भात अजित पवार यांच्यासमोर काल सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणादरम्यान पवार यांनी काही सुधारणा सुचविल्या असून त्या दृष्टीने हे काम वेगाने पूर्ण करा, निसर्गाला कोठेही धक्का न लावता, तळ्यांसह झाडे व इतर बाबी तशाच अबाधित ठेवून वनउद्यानाची निर्मिती करा, असे सांगितले आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम आता लवकरच सुरू होणार आहे. या भागामधील निसर्गसौंदर्य अनेकांना भुरळ पाडेल असे असून या निर्मितीनंतर बारामतीला एक नवीन आकर्षण निर्माण होणार आहे.

बारामती शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील या क्षेत्रात चिंकाराचा नैसर्गिक अधिवास आहे. याशिवाय ससे, खोकड, खार, लांडगा, तरस, घोरपड हे प्राणी तर गरुड, वेडा राघू, गांधारी, कापशी, तुरेवाला चंडोल, मोर, कावळा, तिकर, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल हे पक्षीही मोठ्या संख्येने आढळतात. नीम, सिसू, खैर, हिवर, बोर, बाभूळ, कुसळी या वृक्षांसोबतच माखेल, पवन्या या प्रजातीचे गवतही मुबलक आहे. वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का न लावता संपूर्ण वनक्षेत्रात वनविकास व पर्यटक आकर्षित होतील, अशी कामे करण्याचे या उद्यानाच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. बारामतीचे भविष्यातील आकर्षण असलेल्या शिवसृष्टीच्या नजीक हे उद्यान होणार आहे. या ठिकाणी फुलपाखरांचा मोठा अधिवास असल्याने येथे “बटरफ्लाय गार्डन’ होणार असून तेही भविष्यातील एक आकर्षण असेल. येथे असलेल्या दोन नैसर्गिक तळ्यांचे विकसन करून तेथे बोटींग सुरू करण्याचाही विचार आहे. लहान मुले, प्रौढ तसेच ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येक घटकासाठी येथे काही तरी नवीन केले जाणार आहे. वनविभागही या वर काम करीत आहे.

उद्यान कसे असणार?
– स्वागत कमान
– वन्यप्राण्यांसाठी छोटे पाणवठे
– स्थानिक वनस्पती व बांबूचे रोपवन
– गवती ओटे होणार
– जल व मृद संधारणाची कामे
– गॅबियन वॉल
– निसर्ग पायवाट
– वनतलावांचे सुशोभीकरण
– झाडांना ओटे
– चेनलिंक फेन्सिंग
– नैसर्गिक पॅगोडा

उद्यानात काय असणार?
– मधमाश्‍यांच्या अधिवासाची जागा (हनी बी पार्क)
– बटरफ्लाय गार्डन
– विविध कार्यक्रमांसाठी अँम्पीथिएटर
– सर्प उद्यान
– पिकनिक एरिया व रेस्टॉरंट
– चिंकारा पार्क (35 एकर क्षेत्रात)
– थीम गार्डन
– मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.