गुरु-शिष्य नात्याची भावपूर्ण कथा अलगद उलगडून सांगणारा आणि धर्मवीरांच्या आठवणीने डोळ्यांत अश्रू आणणारा चित्रपट; मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष!

Spread the love

धर्मवीर चित्रपट पाहण्याचा नाही तर अनुभवण्याचा..

काल धर्मवीर पाहिला…आणि थक्क झालो… निर्माता मंगेश देसाई – दिग्दर्शक प्रवीण तरडे या जोडगोळीन अक्षरश कमाल केलीय.. तरं असणाऱ्या वंदनीय धर्मवीरांचं आभाळा एवढं व्यक्तिमत्व करण्याच शिवधनुष्य अभिनेता प्रसाद ओक यांनी लिलया पेलल आहे… दिघे साहेब यांचे डोळे, सिगारेट ओढण्याची विशिष्ट लकब, अंगठ्या असलेला हात हलविण्याची पद्धत…सर्व काही एवढे सेम टु सेम की वाटावे आपण समक्ष धर्मवीर आनंद दिघे साहेब यांस प्रत्यक्षात अनुभवत आहोत….श्री प्रसाद ओक हे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भुमिका अक्षरशः जगले आहेत हे नक्की….ओक यांच्या सहित कलाकारांना हुबेहूब साकारणारे मेक अप आर्टिस्ट श्री विद्याधर भट्टे यांचेही अभिनंदन करायलाच हवे..

…दणदणीत डायलॉग , उत्कृष्ट कॅमेरा वर्क , अचूक स्टारकास्ट निवड , दाक्षिणात्य सिनेमात अंगावर येणारे भव्य सेट आणि भडक रंगाचा वापर…सर्वच अप्रतिम….बॉलीवूडच्या संजय लीला भंसाली किंवा टोलीवूडच्या राजमौलीच्या तोडीस तोड मराठीत सिनेमा बनविल्याबद्दल देसाई – तर्डे जोडगोळीचे महाराष्ट्राने आभार मानायला हवेत…आणि महत्वाचे म्हणजे अखंड महाराष्ट्राने हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आयुष्यभर ऋणातच राहायला हवं….

खरं तर चित्रपट पाहून झाल्यांनतर सिनेमाचा फर्स्ट डे – फर्स्ट शो पाहायला ठाण्यातच थांबायला हवं होत याची जाणीव झाली…पण धर्मवीरांचेच शिष्य असलेल्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे तितकेच संवेदनशील सुपुत्र खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर सुरु असलेल्या आरोग्याचा महायज्ञ उपक्रम अंतर्गत जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी मध्ये सिनेमा रिलीज दिवशीच आरोग्य शिबीर असल्याने धर्मवीर पाहू शकलो नव्हतो…

पण “देर आये दुरुस्त आये” या म्हणीनुसार ठाण्यात पोहोचता क्षणीच चित्रपट पाहिला…सुरुवातीच्या फ्रेम पासूनच धर्मवीर प्रेक्षकांच्या मनावर पकड घेतो..बॉलिवूड पार्टी कव्हर करायची संधी हुकल्याने टी व्ही चॅनेलची महिला पत्रकार नाक मुरडतच ठाण्यात धर्मवीरांची पुण्यतिथी कव्हर करण्यासाठी पोहोचते…आणि गूगल पुरत वाचन मर्यादित असणाऱ्या या महिला पत्रकाराला एका रिक्षाचालकाच्या माध्यमातून “धर्मवीर” नावाचा माणूस कळत जातो…अस्सखलित इंग्रजी बोलणारा हा रिक्षाचालक नक्की कोण असतो हे पाहण्यासाठी “धर्मवीर” चित्रपटगृहात जाऊन पाहायलाच हवा…

मंडल – कमंडलू चे राजकारण , रथयात्रा यामुळे नव्वदच्या दशकात देशात मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण झालं होतं ..त्यातच अयोध्येतील बाबरी मशीद पतनानंतर ठिकठिकाणी हिंदू – मुस्लिम धार्मिक दंगली झाल्या…ठाण्यातील मुस्लिम बहुल राबोडी भागात शिवसेना महिला आघाडीच्या बिर्जे बाईंच्या घरावर धर्मांध मुस्लिम जमाव चालून येतो आणि त्याविरोधात साक्षात धर्मवीर आनंद दिघे बाजीप्रभूंच्या सारखे पाय रोवून उभे राहतात…घरात लपून बसलेल्या नेभळट हिंदूंच्या मनात अंगार पेटवितात…आणि मनगटात तलवार घ्यायला भाग पाडतात.. आणि आकाशालाही कंप सुटावा अशी एक डरकाळी ऐकू येते ..”जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं…” पण हेच दिघे साहेब पुढे डोक्यावर गोल टोपी असणाऱ्या राष्ट्रप्रेमी मुस्लिम बांधवाना आपला विरोध नाही तर डोक्यात जिहाद असणाऱ्या धर्मांध मुस्लिमांना आपला विरोध असल्याचे सांगत आपली रोखठोक भूमिका स्पष्ट करतात…

नाशिक – मालेगाव मधून येणाऱ्या शिवसैनिकांनाही दिघे साहेब कसे जीव लावायचे , हे विद्यमान कृषी मंत्री श्री दादा भूसे साहेब यांच्या एका प्रसंगाच्या माध्यमातून अनुभवता येतं… तरं माजी आमदार स्वर्गीय श्री मो.दा. जोशी यांना निवडणुकीत तिकीट मिळवून देण्यासाठी वापरलेली युक्तीमधून दिघे साहेब राजकीय डावपेचात किती माहीर होतें याची साक्ष मिळते मिळते…प्रवासात दिघेसाहेब झोपलेले असताना झोपेत पाठीमागील सीट वरून त्यांचे डोके पकडणारे हेमंत पवार लक्षात राहतात..

मात्र, धर्मवीर चित्रपटामधून मला व्यक्तिशः काय अनुभवायला आणि शिकायला मिळालं; तर ते “गुरु – शिष्याचे भावपूर्ण नाते…” वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यातील गुरु – शिष्याचे भावपूर्ण नाते पाहण्यासाठी आणि आपल्या आपल्या परीने स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणण्यासाठी तरी धर्मवीर पाहायलाच हवा ….”गुरुपौर्णिमाचा कसला आलाय त्रास..आणि तसही गुरुपौर्णिमा गुरूचा नसून शिष्यांचा सण असतो…” अशा दमदार डायलॉग मधून तर गुरु ब्राम्ह – गुरु विष्णू या संगीतबद्ध भावपूर्ण गाण्यामधून गुरुपौर्णिमा आपल्या काळजात घर करून बसते..विशेतः बाळासाहेबांसाठी विणलेला सोनचाफा फुलांचा हार आणि पाद्यपूजा लक्षात राहते…

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पाद्यपूजन आणि गुरुवंदना झाल्यानंतर परतीच्या प्रवासात एका नदीच्या ठिकाणी गाड्या थांबविल्या जातात आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे शिष्य त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करतात…त्यावेळचे शिवसैनिक असलेले आदरणीय एकनाथ शिंदे , सर्वश्री राजन विचारे, रवींद्र फाटक , हेमंत पवार , विलास जोशी, विजय साळवी, जगदीश थोरात , दिघे साहेब यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झाडांवरील फुले तोडून आणतात आणि त्याचाच एक छोटा बुके बनवून देतात….

गुरुपौर्णिमा प्रसंग केवळ अद्भुत आणि अविस्मरणीय….

त्यानंतर सध्याचे नगरविकास मंत्री आणि तेव्हाचे दिघे साहेब यांचे आवडते शिष्य श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आयुष्यातील कटू प्रसंग अक्षरश काळीज चिरून टाकतो…पाषाण हृदयी माणूस सुद्धा घळा घळा रडेल अशा पद्धतीने हा प्रसंग साकारला गेला आहे…हा प्रसंग पाहताना माझे स्वतःचे अश्रू एवढे अनावर होत होते कि , थिएटर मधून बाहेर पडावे असे वाटतं होते…पण बाहेर पडलो तर काहीतरी मिस करू याभावनेने काळजावर दगड ठेवून संपूर्ण सिनेमा पाहिला…

पुत्र वियोगाच्या अतीव दुःखात आकंठ बुडालेल्या आणि घरात स्वतःला कोंडून ठेवलेल्या श्री एकनाथ शिंदे साहेब यांस दुःखातून बाहेर काढण्यासाठी थेट घरात घुसलेले दिघे पाहताना मन गलबलून जात…त्यानंतर या गुरु – शिष्याची भावपूर्ण भेट , आणि दिघे साहेब यांचा आदेश कि , आता दुखवटा पुरे..स्वतःचे डोळे कोरडे कर आणि अश्रू डोळ्यांत असलेल्या लोकांची सेवा कर…अनाथांचा नाथ हो…लोकांचा लोकनाथ हो….हा भावपूर्ण प्रसंग पाहताना आपल्या डोळ्यांत अश्रू आल्यावाचून राहत नाही…

एकाकी पडलेल्या आणि एकलकोंडे झालेल्या श्री एकनाथ शिंदे साहेब यांस पुन्हा लोकांत आणण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची युक्ती श्री दिघे साहेब लढवितात आणि तेव्हाचे ठाणे महापालिका सभागृह नेते श्री राजन विचारे साहेब यांस बोलवून घेतात…श्री दिघे साहेब यांचा शब्द शिरसावंद्य मानत श्री राजन विचारे साहेब एका क्षणात सभागृह नेते पदाचा राजीनामा देतात आणि तात्काळ स्वतःची गाडी श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वागतासाठी कडे पाठवून देतात…

धन्य ते धर्मवीर आणि धन्य त्यांचे शिष्य….

धर्मवीर दिघे साहेब यांचावर चाललेला टाडा खटला , त्यात झालेली निर्दोष सुटका , आमच्या दिघे काकांची सुटका व्हावी यासाठी लहान मुलांनी काढलेला मोर्चा , बलात्कारी व्यक्तीला केलेली शिक्षा , रक्षाबंधन सोहळा आणि शेवटी काळजात धस्स करणारा अपघाती मृत्यू त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पेटवून दिलेले सिंघानिया हॉस्पिटल प्रकरण…. हे सर्व पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब चित्रपट आजच पहा…

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.