स्मार्ट फोन आणि संगणक नसल्याने; ऑनलाईन शिक्षण घेताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी!
पुणे | कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षण सुरू केले; परंतु ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. पालक किंवा विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन किंवा संगणक नाही, शिवाय गावात नेटवर्क आणि विजेची मोठी समस्या असल्याने गोर-गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी शेती कामात गुंतल्याचे दिसून येत आहे. तर शहरी भागातील विद्यार्थी आनलाईन शिक्षण घेत असल्याने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विषमता निर्माण होत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील शाळा बंद आहेत. परंतु खासगी शाळांनी मात्र आनलाईन पद्धतीने अध्यापन सुरूच ठेवले आहे. त्यामुळे शहरी भागातील विद्यार्थी घरूनच शिक्षण घेत आहेत.
दूसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी जुलै महिना संपल्यानंतर सुद्धा
शिक्षणापासून वंचित आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नाही, संगणक नाही आणि मोठी समस्या म्हणजे वीज आणि नेटवर्क सुद्धा सुरळीत राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घ्यावे कसे? हा मोठा प्रश्न आहे. या स्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आता शेतातच काम करताना दिसत आहेत. पोटाची खळगी भरावी म्हणून आई, वडिलांना मदत करत आहेत. गत सहा महिन्यांपासून कोरोनाचे संकट आहे. परिणामी दैनंदिन जीवनात उदरनिर्वासाठी ज्या उलाढाली होत होत्या. त्या थांबल्या आहेत. मोलमजुरी समाधानकारक नाही. लहान मोठे, उद्योगाची चक्रे मंदावली आहेत. कोणी उसनवारीचा व्यवहार करत नाही. त्यामध्ये शेतकऱ्यांना पेरणी, डवरणी, फवारणी, निंदन आदी कामासाठी पैसे खर्च करावे लागतात. या स्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून आनलाईन शिक्षणाला येणाऱ्या खर्चामुळे पालकांसमोरील आर्थिक संकट गडद झाले आहे. अशा स्थितीपळे ग्रामीण भागातील ऑनलाइन शिक्षणाचा पूर्णतः बोजवारा उडालन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला एक प्रकारचा महामारीमुळे धोका निर्माण झाला आहे.