Maharashtra New Guidelines – डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता; आजपासून राज्यात नवे निर्बंध लागू!
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने सोमवार 28 जून 2021 पासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू कऱण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधात विस्तार करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्व दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 50 % क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच
मुंबईचा समावेश तिसऱ्या स्तरात होत असल्याने लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा यापूर्वी प्रमाणे सुरू राहणार आहे.
- 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊ नये.
- बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या 50% पेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही.
- खुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या 25% पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही.
- कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी 3 तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही.
- एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी संमेलने होत असतील तर तिथे कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केलेले असावे किंवा त्यांच्या नियतकालिक चाचण्या आवश्यक असतील.
- संमेलन अथवा मेळावे होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेले SOPचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे.
- हॉटेलमधील उपहारगृहे हे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी मर्यादित असेल. तेही क्षमतेच्या 50 % अटींवर आणि सर्व SOP यांच पालन करुन बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी लागू असलेल्या निर्बंधांचा पालन करून सेवा देता येईल.