आजही राजर्षी शाहूंच्या विचार आणि कृतीची समाजाला गरज; संभाजी ब्रिगेड प्रदेश निरीक्षक विकास पासलकर!
पुणे | राजर्षी शाहू महाराजांचे कार्य अद्याप पूर्ण व्हायचे आहे. आजही समाजात गोरगरीब, शोषित यांची अवस्था बिकट आहे. आजही समाजामध्ये उच्च निचतेची भावना आहे. आजही समाजामध्ये शैक्षणिक मागासलेपणा आहे आणि म्हणूनच आजही राजर्षी शाहूंच्या विचार आणि कृतीची समाजाला गरज आहे. मणभर विचारांपेक्षा कणभर कृती सर्वश्रेष्ठ असते असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश निरीक्षक विकास पासलकर यांनी व्यक्त केले.
फक्त राजर्षी शाहू महाराजांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे व हे काम राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन करत आहे असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केले. राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन आयोजित राजर्षी शाहू महोत्सव 2021 या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी गंगाधर बनबरे सर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर मोजक्याच सन्मानियांच्या उपस्थितीत हा महोत्सव साजरा करण्यात आला असला तरीही फाउंडेशनच्या कामात कुठेही खंड पडू दिला जाणार नाही. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेची मदत चेकच्या माध्यमातून घर पोहोच केली जाईल असं विकास पासलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त प्रतिवर्षी राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे हे 7 वे वर्ष आहे. डॉ. जयश्रीताई चव्हाण, गारगोटी ,कोल्हापूर. मा. नितीन उदास, पुणे मनपा उपायुक्त. मा. अजयदादा विरसेन जाधवराव, सातारा). मा. प्रवीण व्यवहारे, मनमाड, नाशिक. मा. भूषण सुर्वे, इंदापूर. मा. रोहित जाधव, सातारा यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक मा.अशोक काकडे, मा.विजय देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी, मा. राजेंद्र पवार अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, मा.विकास पासलकर, संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक, मारुतीराव सातपुते, पुणे जिल्हा सचिव मराठा सेवा संघ, पाथर्डी तालुकाअध्यक्ष बाळासाहेब सोनाळे उपस्थित होते.
हा संपूर्ण कार्यक्रम फेसबुकवर राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या पेजवरून प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, सचिव प्रशांत धुमाळ, युवराज ढवळे, रोहित ढमाले यांनी केले.