पुणे जिल्ह्यातील इंदापुर-बारामतीला कोरोनाचा मोठा विळखा; जिल्हाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली!
इंदापुर | बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत असल्याने सर्वांच्याच काळजीत दिवसागणिक भर पडत आहे. रविवारी 23 रोजी बारामतीतील कोरोनारुग्णांच्या संख्येने 541 चा आकडा गाठला. दिवसभरात बारामतीत 21 जण कोरोनाग्रस्त असल्याचे तपासणीनंतर निष्पन्न झाले. यात बारामती शहरातील 16 आणि ग्रामीण भागातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी घेतलेल्या 115 आरटीपीसीआर नमुन्यापैकी 13 जणांचा तर खाजगी प्रयोगशाळेतील 24 पैकी आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
रविवारी आरटीपीसीआर तपासणी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाटस रोड येथील दोन, शंकर भोई गल्ली येथील चार, खंडोबा नगर येथील दोन, कसबा येथील एक, सिद्धार्थ नगर येथील एक, फलटण रोड येथील एक व ग्रामीण भागातील काटेवाडी येथील एक आणि वडगाव निंबाळकर येथील एक असे 13 जण आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आले आहेत. एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट येथील दोन, विवेकानंद नगर येथील एक, सूर्यनगरी येथील एक आणि आमराई येथील एक, वडगाव निंबाळकर येथील एक, वाणेवाडी येथील एक आणि गुणवडी येथील एक अशा रुग्णांचा समावेश आहे.
इंदापूरात आढळले 18 नवे रुग्ण
इंदापूर तालुक्यात 18 जण कोरोना बाधित निघाल्याने तालुक्यात एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 460 झाली आहे. दरम्यान
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी इंदापूर कोविड केअर केंद्रास भेट देवून प्रशासनास कोरोना उपाययोजना गांभीर्याने घ्या, असा मोलाचा सल्ला दिल्यानंतर प्रशासन हलले आहे. बारामती प्रांताधिकाऱ्यांनी ६ ऑगस्ट रोजी हॉस्पिटल अधिग्रहण करण्याच्या दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी २३ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील रुग्णांना तालुक्यात हॉस्पिटलमध्ये खाट मिळत नसल्याने इतर जिल्ह्यात वणवण फिरावे लागत होते, मात्र आता हॉस्पिटल अधिग्रहण झाल्याने रुग्ण आणि नातेवाईकांचा मनस्ताप वाचला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देशमुख यांचा इंदापूर दौरा फलदायी झाला असल्याचे दिसून आले आहे.