मनसेला आणि राज ठाकरेंना डिवचणारा सुशील केडिया कोण?

मुंबई: एकीकडे शनिवारी ठाकरे बंधूंचा विजय मेळावा वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी विजयी मेळावा होणार असल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भायंदर येथील एका स्वीट मार्टच्या मालकाला मारहाण केल्याने नवीन वाद निर्माण झाला. त्यामुळे, अनेक व्यापारी एकत्र येत मनसेच्या दडपशाहीला विरोध दर्शवला आहे. अशातच, शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट करून राज ठाकरेंना डिवचलं होतं. ‘मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मला मराठी येत नाही, बोल क्या करना है?’, असा सवाल केडिया यांनी उपस्थित केला होता. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडला आहे आणि ते म्हणजे शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया आहे तरी कोण? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
‘एक्स’वर काय बरळले सुशील केडिया?
उद्योजक सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना डिवचत म्हणाले की, ‘राज ठाकरे हे लक्षात ठेवा, मी गेल्या 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल?’.
कोण आहे सुशील केडिया?
सुशील केडिया हे शेअर मार्केटमधील ‘केडियोनॉमिक्स’ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांची फर्म ही सेबी नोंदणीकृत ट्रेडिंग आणि सल्लागार फर्म आहे. शेअर बाजारातील त्यांच्या अनुभवामुळे, ते अनेकदा विविध आर्थिक वृत्तवाहिन्यांवर विश्लेषक आणि समालोचक म्हणून काम करतात. केडिया यांनी राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँकांमध्ये तसेच दोन मोठ्या हेज फंडांमध्ये 25 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. जून 2025 पर्यंत सुशील केडिया यांचे एकूण मूल्य 3,103 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या 45 कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत.