मुंबई | “उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नाही. पण मुख्यमंत्री झाले. अजित पवार यांना त्यांच्या मताचा अधिकार मिळाल्यापासून ते आमदार आहेत. कोणतंही सरकार येऊ दे ते आहेतच. मग ते देवेंद्रजींसोबत उपमुख्यमंत्री आहेत, उद्धव ठाकरेंसोबतही उपमुख्यमंत्री आहेत. ही ताकद ते वापरणार आहेत की नाहीत? ते कडक हेडमास्तर आहेत, अशी त्यांची ख्याती आहे. पण त्यांनी ते दाखवलं पाहिजे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यातील कोरोनाची स्थिती, तरुण पत्रकार रायकर यांचा प्रशासनाच्या हलगर्जीमुळे झालेला मृत्यू यावरून विरोधी पक्षातील नेते सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार आहेत? दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापूर्तीसाठी ते मुख्यमंत्री झाले असतील तर कामं करण्यासाठी आणखी एक मुख्यमंत्री ठेवा.” असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूने विरोधी पक्षातील नेते सरकारवर चांगलेच चिडले आहेत. रायकर यांच्यावर पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते.
जम्बो सेंटरमधून पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध न झाल्याने रायकर यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. पाटील म्हणाले, “पुणे-मुंबई दोन तासांचं अंतर आहे. मुंबईत कोरोना काळात काय काम आहे? कामं असतील तर निम्मे दिवस तिथे तर निम्मे दिवस इथे राहा, असं अजित पवारांना मी वारंवार म्हणतो.
जम्बो हॉस्पिटलकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे. सगळ्या हॉस्पिटलबाहेर स्क्रीन लावलं पाहिजे. स्काईपवर सर्व नातेवाइकांना बोलायला दिलं पाहिजे. रुग्ण कोविड सेंटरमध्ये गेला तर एक तर तो बरा होऊन येतो नाही तर थेट स्मशानभूमीत जातो. रोजच्या रोज नातेवाइकांशी बोलल्यानंतर तो पेशंट बरा होईल. कोणतीही संवेदनशीलता नाही. एक घर म्हणून सरकार चालवावं. मात्र तसं नाही. ” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.