वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची ओळख करून देणारा हा लेख!

Spread the love

ठाणे | संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मूळ संकल्पक तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटेसर यांचा परिचय आणि प्रवास थक्क करणारा..!!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडणारे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांकरिता काम करणारे मंगेश नरसिंह चिवटे यांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार मंगेश चिवटे सर हे महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी असणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या शिस्तपालन व अंगिकरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य पदी कार्यरत आहेत. मंत्रालयात एकीकडे इलेट्रॉनिक माध्यमात पत्रकारिता करत असतानाच दुसरीकडे मंगेश चिवटे सरांचा आरोग्य विषयक कामामध्ये विशेष रस होता. गावाकडील गोरगरीब रुग्णांची मुंबईतील विविध धर्मशाळामध्ये राहण्याची व्यवस्था करणे, धर्मादाय अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयात आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी आरक्षित असलेले बेड गोरगरीब रुग्णांना उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेसाठी पाठपुरावा करून मंगेश चिवटे सरांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने शेकडो रुग्णांना लाभ मिळवून दिला.

ऑक्टोबर 2014 मध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंगेश चिवटे सरांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे अर्थिक परिस्थिती हलाखीची असणार्‍या रूग्णांकरिता महागड्या शस्त्रक्रियासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून अर्थ सहाय्य देण्यात यावे म्हणून ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा’ची संकल्पना मांडली आणि याची सुरूवात करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या सलग चार महिन्यांच्या पाठपुराव्याला यश आले व 17 मार्च 2015 मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीची सुरूवात करण्यात आली. मंगेश चिवटे सरांच्या शिफारशी नुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती कऱण्यात आली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आजवर 53 हजार पेक्षा अधिक रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. 526 कोटींचा निधी या उपचारांसाठी मंजूर करण्यात आला आहे. संपुर्ण महाराष्ट्रातून रूग्ण या योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात. 2005 साली मुंबईत आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अचलपुरचे तत्कालीन आमदार आणि विद्यमान जलसंपदा राज्यमंत्री मा ना श्री बच्चू कडू यांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांचे आरोग्य क्षेत्रातील काम पाहून आपल्याला हे काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे ते सांगतात.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या यशस्वी निर्मितीनंतर शिवसेना पक्षाच्या वतीने गोरगरीब गरजू रुग्णासाठी शिवेसना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करण्यात यावी अशी संकल्पना मंगेश चिवटे सरांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर ठेवली. त्यानुसार ठाण्यात 17 नोव्हेंबर 2017 रोजी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना करण्यात आली. या वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख म्हणून मंगेश चिवटे सर काम पाहत आहेत. 17 नोव्हेंबर 2018 रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे तथा शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भवनातून देखील शिवसेना वैद्यकीय कक्षाचे दैनंदिन कामकाज सुरू झाले आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून आजपर्यंत एकूण 55 पेक्षा अधिक महाआरोग्य शिबीरात मिळून 3 लाख 25 हजार पेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षांत या तपासणीतून निदान झालेल्या जवळपास 12 हजार हुन अधिक रुग्णांची मोतीबिंदू, एन्जीओप्लास्टी, बायपाससारख्या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या या कक्षातून आजवर 55 कोटी रूपयांहून अधिक मदत गरजूं रूग्णांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.

यासोबतच केरळ आणि सांगली कोल्हापूर येथे झालेल्या महापुरात ठाणे येथील 100 डॉक्टरांच्या सहकार्याने सुमारे 75 हजार नागरिकांची मोफत प्राथमिक तपासणी आणि मोफत औषध पुरवठा करण्याच्या नियोजनाची मंगेश चिवटे सरांनी मा. खा.डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पाडली होती. केरळ मध्ये झालेल्या महाआरोग्य शिबिरांत जवळपास 1.5 कोटी तर सांगली कोल्हापूर येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरांत जवळपास 2.5 कोटी रुपयांची औषध शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत पुरविण्यात आली होती.

पत्रकारिता कारकीर्द –
इलेक्ट्रॉनिक मीडियात लहान वयात मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न मंगेश चिवटे यांनी केला. 2008 साली सुरुवातीला स्टार माझासाठी मंत्रालय प्रतिनिधी, त्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तावाहीनी साठी दिल्ली येथे ब्यूरो चीफ, साम टी व्ही साठी मुख्य राजकीय वार्ताहर आणि त्यांनंतर IBN लोकमत मध्ये उप वृत्तसंपादक असा त्यांचा पत्रकारितेमधील प्रवास राहिला आहे.

मंगेश चिवटे सरांनी आपल्या 10 वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, भाजपाचे राज्याचे नेते स्व गोपिनाथजी मुंडे, काँग्रेसचे राज्याचे नेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, काँग्रेस प्रदेशअद्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांसारख्या दिग्गजांची मुलाखती घेतल्या आहेत. 26/11 च्या मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला स्टार माझाकडून कव्हर करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यावेळी तत्कालीन ATS प्रमुख शहीद हेमंत करकरे यांची CST स्टेशनमध्ये आत प्रवेश करतानाची दृश्य त्यांनी टिपली होती. भारताला पहिले ओलम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू स्व खाशाबा जाधव यांस मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळावा, त्यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारावे तसेच त्यांच्या जयंतीदिनी राज्यात क्रीडा दिन साजरा करण्यात यावा यासंदर्भात IBN लोकमतवर केलेल्या विशेष बातमीची विधानसभेत चर्चा झाली होती.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.