रणगाव येथील औरंगाबाद डिस्टलरी खाजगी कंपनी परिसरात जलप्रदूषण, वायूप्रदुषण करत असल्याने कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी!
इंदापूर (वालचंदनगर) | रणगाव येथील औरंगाबाद डिस्टलरी ही खाजगी कंपनी परिसरात जलप्रदूषण, वायूप्रदुषण करत असल्याने सदर कंपनीवर व कंपनीस पाठिशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे, कालव्यातून नियमबाह्य पाणी वाटप करुन कंपनीस जलप्रदूषण करण्यास सहकार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून मंत्रालयातील अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात सबळ पुराव्यांसह दाखल करण्यात आली आहे.
निमसाखर हद्दीतून वाहणाऱ्या शेळगाव ओढ्यात औरंगाबाद डिस्टलरी प्रा.लिमिटेड ही खाजगी कंपनी रासायनिक व मळीमिश्रीत पाणी सोडून सदर ओढा व नीरा नदीतील पाणी प्रदूषित करत आहे. त्यामुळे जनावरांच्या, माणसांच्या आरोग्यास मोठी हानी होत असून अनेक आजार परिसरात पसरत आहेत. परिसरातील जमीनी नापिक होत असून उत्पादनात घट होत आहे. त्यासंबंधीच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांचेकडे करुनही काहीच कारवाई होत नसल्याने, सदर कंपनीस ग्रामपंचायत पातळीवरुन, खाजगी नागरिकांकडून पत्रव्यवहार करुनही कंपनी व प्रदूषण मंडळाचे अधिकारी सदर तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याने सदर कंपनी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी निमसाखर येथील युवा शेतकरी सुदर्शन अनिलराव रणवरे यांनी नुकतीच मुंबई हायकोर्टात जनहीत याचिका दाखल केली आहे.