आनंदाची बातमी: लाल परी अखेर पुणे जिल्ह्यात धावणार!
पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून पुणे जिल्ह्याअंतर्गत ४० मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेला नुकतीच सुरुवात झाली आहे. नेहमीच्याच दरात ही एसटीची सेवा सुरु करण्यात आली आहे. या प्रवासासाठी कुठल्याही ई-पासची आवश्यकता नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु केली असून, सध्या ५५ बसेस रस्त्यांवर धावत आहेत. सरकारने फिजिकल डिस्टंसिंगच्या घालून दिलेल्या नियमांप्रमाणे, प्रत्येक बसमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा निम्म्याच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
एसटी गाड्या ह्या पुण्याहून बारामती, भोर, शिरुर, सासवड, नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, दौंड, पाटस, नीरा, जुन्नर, आळेफाटा, भीमाशंकर, वेल्हा, पौड, मुळशी या मार्गावर सुरू आहेत. तसेच बारामती-भिगवण, बारामती-वालचंदनगर, बारामती-दौंड, स्वारगेट-वेल्हा, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, नारायणगाव-जुन्नर आणि जुन्न-देवळे या मार्गावर सुरु करण्यात आल्या आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून देण्यात आली.