माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उद्धटपणा, वारकरी महिलेला जोरात ढकलून दिलं; व्हिडिओ व्हायरल

Spread the love

सोलापूर | राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला मिळत असून लाखो पाऊले पंढरीची वाट चालत आहेत. ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगती ही पाऊले पंढरीच्या दिशेने विठ्ठल भक्तीच्या ओढीने पुढे जात आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्या पालख्याही मोठ्या भक्तीभावाने मार्गक्रमण करत आहेत. कुठे दिंडी सोहळा, कुठे रिंगण सोहळा, कुठे अवजड घाट सर करत माऊली माऊलची गजर पाहायला मिळत आहे. मात्र, एका रिंगण सोहळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत असून वारीची शिस्त आणि वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट लावणारा हा व्हिडिओ आहे. डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या एका महिला वाकऱ्यासोबत एका चोपदाराने उद्धट वर्तन केल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमात व्हायरल होऊ लागला असून यामध्ये चोपदार एका महिलेला ढकलून देताना आणि पुन्हा वाद करताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी आज 3 जुलै सकाळी वेळापूरहून प्रस्थान झाल्यावर उघडेवाडी येथे माऊलींचे ऊभे रिंगण पार पडले. हे रिंगण झाल्यानंतर काही स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या. दरम्यान, अचानक या दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि तुळस डोक्यावर घेतलेल्या एका महिला वारकऱ्यास जोरात ढकलून दिले. त्यामुळे, ती महिला वारकरी गोल रिंगण करुन समोर बसलेल्या वारकरी माऊींच्या आंगावर पडली. विशेष म्हणजे या महिला वारकरी भक्ताच्या डोक्यावरील तुळस पितळाची होती, दुर्दैवाने ती तुळस इतर कोणाला किंवा त्याच महिलेला लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता. एवढं होऊनही हे चोपदार महाशय थांबले नाहीत, जोरजोराने ओरडत या महिलेशी ते वाद घालत होते.

दरम्यान, संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणजेच आई म्हणतात, आणि याच माऊलीच्या पालखीत एका महिला वारकऱ्यास अशा पद्धतीची वागणूक येणे दुःखद आहे. त्यामुळेच, नेटीझन्सकडून या चोपदाराच्या उद्धटपणावर जोरदार प्रहार केला जात आहे. वारी म्हणजे शिस्त, शांती आणि प्रेमाची शिकवण देणारा वैष्णवांचा उत्सव. मात्र, माऊलींच्या पालखीतील हे चोपदार महाशय ही शिकवण विसरले काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Google Ad

ताज्या बातम्या

error: या पोर्टल वरील सर्व बातम्या, लेख, फोटो यांचे सर्व हक्क संपादकांकडे असून, परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये.